Pune : सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी दूध संकलन संस्था बक्षिसे देत असतात. बक्षिसामध्ये काही थोडीफार रक्कम असते किंवा एखादी वस्तू हे दिले जाते नाहीतर इलेक्ट्रिक वस्तू असतेच. पण सांगली जिल्ह्यातील एका दूध संकलन संस्थेने सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल २ तोळे सोनं बक्षिस म्हणून दिलं आहे.
सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्द येथील ही दूध संकलन संस्था आहे. या संस्थेने एका वर्षामध्ये सर्वांत जास्त गायीचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला आणि सर्वांत जास्त म्हशीचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला प्रत्येकी १ तोळा सोन्याचे बक्षीस दिले आहे. यामुळे या संस्थेची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. विशेष म्हणजे गाय आणि म्हैशीच्या सर्वाधिक दूध उत्पादनासाठी बक्षीस मिळालेले शिवाजी पाटील व भानुदास माळी हे दोन्ही तरूण शेतकरी उच्चशिक्षित आहेत.
सध्याच्या काळात अनेकजण उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत. अनेकांना दुधाचा व्यवसाय तोट्याचा वाटतो. पण दुधाचा व्यवसाय योग्य पद्धतीने केला तर नक्कीच फायद्याचा आहे. ऐतवडे खुर्द येथील हे तरुण यासाठी एक उदाहरणच आहेत.
स्पर्धा परिक्षेचा अभ्यास आणि दूध उत्पादनशिवाजी पाटील हे ऐतवडे खुर्द येथील उच्चशिक्षित शेतकरी आहेत. ते सध्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करतात. यासोबतच त्यांचा म्हैशींचा गोठा आहे. त्यांनी संस्थेला सर्वाधिक म्हशीच्या दुधाचा पुरवठा केला यासाठी त्यांना सत्यशोधक दूध संस्थेने १ तोळा सोन्याचे बक्षीस दिले आहे. या संस्थेमध्ये शिवाजी पाटील यांनी या वर्षात १४,७५१ लिटर एवढ्या दूधाचा पुरवठा केला आहे.
गायीच्या दुधाच्या उत्पादनासाठी एका उच्चशिक्षीत तरुणाने बक्षीस मिळवले आहे. त्याच गावातील भानुदास माळी या शेतकऱ्याला हे बक्षीस मिळाले आहे, भानुदास माळी यांनी बीसीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी शिक्षणानंतर शेती करण्यास सुरवात केली, शेतीसोबतच त्यांनी दुधाचा जोड व्यवसाय सुरु केलाय. त्यांनाही १ तोळा सोनं बक्षीस मिळाले आहे. भानुदास माळी यांनी एका वर्षात ४९,७१२ लिटर दूधाचा पुरवठा केला आहे, हा या वर्षातील गायीच्या दुधाचा सर्वाधिक पुरवठा आहे.
सत्यशोधक दूध संस्थेचा यशस्वी उपक्रमऐतवडे खुर्द येथील सत्यशोधक दूध संस्था प्रत्येक वर्षी नवीन उपक्रम राबवत असते. यावर्षी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी सोन्याचे बक्षीस दिली आहे. यात त्यांनी २ तोळे सोने दिले आहेत. म्हैस दूधासाठी वेगळे बक्षीस आणि गायीच्या दूधासाठी वेगळे बक्षीस दिले आहे. दोन दिवसापूर्वी संस्थेने मोठा कार्यक्रम घेऊन या शेतकऱ्यांचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष विकास चांदणे सांगतात, "ना नफा ना तोटा या तत्वानुसार उत्पादकांना जेवढा फायदा मिळेल तो मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. संस्था स्थापनेपासून आजपर्यंत नेहमीच सर्वापेक्षा जास्त दर, बक्षीस विविध योजना देण्याचा प्रयत्न केला. तरुणांसमोर सध्या रोजगाराची अडचणी आहेत, यामुळे आम्ही दूध उत्पादनातूनही यशस्वी होऊ शकतो यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या संस्थेला दूध पुरवठा करणारे हे उच्चशिक्षित आहेत."
सध्याच्या काळात अनेकजण सांगतात शेती परवडत नाही, शेतीत काहीच उत्पन्न मिळत आहे. पण तुम्ही जर शेतीसोबत दूध व्यवसाय सुरू केला तर आपल्याला नक्कीच फायदा होता. संस्थांनीही जर शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी नवीन कल्पना आणल्यातर शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. सध्या सोन्याचे भाव ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.पण या संस्थेने आपल्या उत्पादकांना सोन्याचे बक्षिसे वाटली आहेत. या संस्थेच्या उपक्रमाची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे.