नाशिक जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने रोजगार हमी योजनेतून राबवलेल्या मिशन भगीरथमधून नुकत्याच झालेल्या पावसात ४६७ सघमी (सहस्त्र घनफूट मीटर) पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने या वर्षात रोजगार हमी योजनेतून ३६५ बंधारे मंजूर केले असून त्यातील १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधाऱ्यांमध्ये मागील आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठा झाला आहे. जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ सघमी साठा झाला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतन जलसंधारणाची कामे करण्यासाठी 'मिशन भगीरथ' ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून गावांची निवड करून तेथे साखळी बंधारे प्रस्तावित केले असून यासाठी रोजगार हमी योजनेचा निधी वापरला जात आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केलेल्या आराखड्यानुसार १५ तालुक्यांमध्ये ६०९ बंधारे प्रस्तावित केले आहेत. यापैकी आतापर्यंत ३६५ बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी १६३ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे बंधारे बांधूनही ऑगस्ट अखेरपर्यंतही त्यात साठा झालेला नव्हता.
अशी आहे योजनाजिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना, तसेच ९०:१० प्रमाण असलेल्या सार्वजनिक कामांच्या योजनांची संख्या वाढल्यामुळे रोजगार हमी योजनेसाठी ठरवण्यात आलेले ६०:४० चे प्रमाण राखण्यात अडचणी येत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ ही जलसंधारणाची योजना तयार करून त्याची एप्रिलपासून अंमलबजावणी सुरु केली. मात्र, या योजनेतील कामांसाठी ९०:१० चे कुशल-अकुशलचे प्रमाण ठरवण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील कुशल अकुशलचे ६०:४० चे प्रमाण बिघडले. यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला रोजगार हमी योजना राबवताना कुशल अकुशल प्रमाण राखण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेने यासाठी मजुरांची संख्या अधिक असणाऱ्या योजनांचा समावेश रोजगार हमी योजनेच्या पुरवणी आराखड्यांमध्ये करून ही योजना सुरूच ठेवली आहे.
रोजगार हमी योजनेतील ३६५ बंधाऱ्याची कामे सुरु असून, १६३ बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस कमी असल्यामुळे कामे पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी आले नव्हते. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे लगतच्या शेतीला सिंचनासाठी उपयोगी पडणार आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांपैकी ५२ बंधारे पूर्ण भरले आहेत.- डॉ. अर्जुन गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प, नाशिक