नसीम शेख
सध्या ग्रामीण भागातील अनेक युवक शिक्षणानंतर शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यात अधिकाधिक उत्पन्न शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. नोकरीच्या मागे न लागता जर शेतीत नवनवीन प्रयोग केले तर निश्चितच शेतीतून नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न सहज मिळते. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येत आहे.
अशातच मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या भातोडी या छोट्याशा गावातील तीन युवा शेतकरी मित्रांनी माळरानावर ड्रॅगनफ्रूट शेती बहरवली आहे. सध्या या शेतीला सुंदर अशी फळे लागली असून, जुलै महिन्याच्या अखेरीस फळेतोडणीला येणार असल्याने या ड्रॅगन शेतीने परिसरातील जनतेला भुरळ घातली आहे.
भातोडी येथील युवा शेतकरी सोपान आत्माराम भोरे, नारायण किसन जगदाळे व गणेश सुभाष मोरे या तीन मित्रांनी शेतात ड्रॅगनफ्रूट शेतीचा प्रयोग करण्याचा निश्चय केला.
गेल्यावर्षी त्यांनी सांगोला (जि. सोलापूर) येथून बेणे आणून आपल्या शेतातील प्रत्येकी दोन एकर क्षेत्रावर 'जम्बो रेड' या जातीची बाग लावली. या तिघांसह त्यांच्या परिवार जणांनी या शेतीची चांगली मेहनत घेतल्याने सध्या एक वर्षानंतरच ही शेती फळांनी बहरली आहे. पहिल्या वर्षीच या शेतीतून प्रत्येकाला एकरी पाच टन उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे.
ज्यातून त्यांना एकरी ७ ते ८ लाखांचे जवळपास उत्पन्न मिळणार आहे. परिसरातील अनेक शेतकरी सध्या या ड्रॅगन शेतीला भेट देऊन माहिती जाणून घेत आहेत. तीन युवकांनी राबवलेल्या या प्रयोगामुळे ड्रॅगन शेती परिसरात करणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या प्रयोगामुळे इतर युवा शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळत आहे. यामुळे रोज अनेक शेतकरी त्यांचा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.
कृषी विभागाचे सहकार्य
आम्ही ड्रॅगन फ्रूटबाबत यू-ट्यूबवर माहिती घेतली. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत लाभकारी आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक ऋतूत मागणी असते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ विशेष गुणकारी आहे. त्यामुळे आम्ही या शेतीचा प्रयोग केला. या झाडाचे लाइफ जवळपास वीस वर्षे आहे. पुढे प्रत्येक वर्षी उत्पन्नात वाढ होत असते. यासाठी आम्हाला तालुका कृषी विभागाचे भरीव सहकार्य लाभले. - सोपान भोरे, शेतकरी, भातोडी.
शेतीला आधुनिकतेची जोड
ड्रॅगन शेतीचा हा प्रयोग नवीनच असल्याने सुरुवातीला मनात भीती होती. यासाठी दोघा मित्रांनी मिळून एकत्रित मानसिकता बनविली. त्यात तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, मंडळ अधिकारी रणजित राजपूत व कृषी सहायक जगदीश बंगाळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करीत आमचा उत्साह वाढविला. आता या शेतीबाबत आम्ही भरपूर माहिती मिळविली आहे. तरुणांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती निश्चितच फायद्याची ठरू शकते. - नारायण जगदाळे, शेतकरी, भातोडी.
आंतरपिकातूनही मिळते उत्पन्न
या ड्रैगन शेतीत कमी वाढणारे मिरची, सोयाबीन आदींसह भाजीपाल्याचे आंतरपीक घेता येते. यामुळे अशा आंतरपिकातून या ड्रॅगनफ्रूट शेतीवरील वर्षभराचा खर्च सहज काढता येतो. मी माझ्या शेतीत मिरचीचे आंतरपीक घेतले आहे. - गणेश भोरे, शेतकरी, भातोडी.