Join us

हायवेवर उघडले मोसंबी ज्यूस सेंटर, महिन्याकाठी मिळणारी कमाई ऐकून व्हाल थक्क!

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 04, 2024 4:38 PM

मोसंबीला बाजारभाव नाही पण शेतकऱ्याने केला अनोखा जुगाड

उन्हाचा कडाका आता वाढू लागला आहे. सध्या मराठवाड्यातील रस्त्यांवर मोसंबी ज्यूसची दुकानं थाटली जात आहेत. दुसरीकडे बाजार समित्यांमध्ये मोसंबीला कमी भाव मिळत असल्याने रस्त्यालगत मोसंबीची बाग असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी ज्यूस सेंटर सुरु करत दिवसाकाठी चांगल्या कमाईसाठी अनोखा जुगाड सुरु केला आहे. छत्रपती संभाजीनगरहून लातूर, धाराशिवकडे जाताना मोसंबी ज्यूसची दुकानं वाढली आहेत. अडूळ गावातील रघुनाथ भावले यांची ज्यूस सेंटरमधून दिवसाकाठी चांगली कमाई होत आहे. धुळे सोलापूर रस्त्याने सरळ जाताना रस्त्याकाठीच रघुनाथ भावले या तरूणाची मोसंबीची बाग. ६ एकरात मोसंबीची रसाळ फळांनी लगडलेली झाडं. 

अवकाळी पाऊस, वातावरणात झालेला बदल आणि तापमानाची निराळ्या तऱ्हेने मोसंबीची फळगळती होऊ लागली. मोसंबीवर रोग पडला. अन् बाजार समितीत मोसंबीचा भावही गडगडला. या तरूणासारखी अनेक शेतकऱ्यांची गत झाली. 

रस्त्याकाठची बाग असल्यानं येणारे जाणारे थांबतील, या विचाराने मोसंबीचा ताजा रस विकण्यासाठी त्यांनी ज्यूस सेंटर सुरु केले. आणि महिन्याकाठी १,००,००० रुपये रघुनाथ भावले या शेतकऱ्याने कमावले.

ज्यूस सेंटरमधून दिवसाला १०००- १२०० रुपये सुटतात असं रघुनाथ भावले सांगत होते. " मार्केटमध्ये मोसंबीला भाव कमी आहे. आता ऊन्हात येणारी जाणारी लोक थांबतात. शनिवार रविवारी जास्त 'रश' असते. त्यामुळं कधीकधी ४ ते ५ हजार रुपयेही दिवसाला मिळतात."

मोसंबी ज्यूस ३० रुपये ग्लास...

धुळे सोलापूर रस्त्यावर असणाऱ्या रघुनाथ यांच्या ज्यूस सेंटरवर मोसंबी ज्यूस ३० रुपये ग्लास या दराने विकला जातो. मोसंबी घ्यायची असेल तर ती ४० रुपये किलोने! येणाऱ्या जाणाऱ्याची वर्दळ असणाऱ्या रस्त्यामुळे ज्यूसची विक्री अधिक होत असल्याचे ते सांगत होते.

छत्रपती संभाजीनगरचा हा भाग तसा मोसंबी उत्पदक शेतकऱ्यांचा. बागायतदार अधिक मात्र, पारंपरिक शेती करणाऱ्यांचंही प्रमाण तेवढंच. रघुनाथ भावले या शेतकऱ्याची पारंपरिक १२ एकर शेती आहे. त्यात तूर, मका , ज्वारी आणि मोसंबी लावल्याचे त्यांनी सांगितले.  ज्यूस सेंटरच्या या कल्पनेमुळे त्यांना महिन्याकाठी भरघोस उत्पन्न मिळत आहे. 

टॅग्स :फळेशेतकरीशेती क्षेत्र