रविंद्र शिऊरकर दुधाला भाव नाही ! दुधव्यवसाय संकाटात ! उत्पन्नाचे फसवे आकडे ! अशी अनेक वाक्य तुम्हाला गेल्या काही दिवसात ऐकायला, वाचायला मिळाली असतील. पण ना घरचा चारा ना जागा तरीही महाराष्ट्रातल्या तरूणाने विकतचा चारा आणि भाडोत्री जागेवर गोठा उभारत वर्षाकाठी चांगलं उत्पन्न मिळवले आहे. श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील आशुतोष बाळासाहेब भोसले यानं बी एसस्सी शिक्षण पूर्ण केलं आणि दुध व्यवसायात वडिलांना मदत म्हणून यायचं ठरवलं. वडिलांनी घरची गरज म्हणून सांभाळलेली एक गाय सांभाळत गोडी निर्माण झाली. मग २०१७ मध्ये घरची बचत आणि बँकेच्या कर्जातून त्यांनी परिसरातील जनावरांच्या बाजारातून उच्च दूध क्षमतेच्या दहा गाई विकत घेतल्या. ३० हजार रुपये प्रति एकर अशा भाडे तत्वावर सात एकर शेती घेऊन त्यात मुक्त संचार गोठा उभारला. काढलेले दूध डेअरीला विकल्याने त्यातून नफा मिळत नसल्याने एक दिवस गावातील एका चौकात दूध विकून बघितले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आजही भोसले उत्पादीत होणारे सर्व दुध श्रीरामपूर मधील डावखर चौकात हातोहात विकतात. सकाळी ७ ते ९ व रात्री ६ ते ९ या वेळेत हे दूध विकले जाते.
गोठ्यातील गाईंचे व्यवस्थापन भोसले यांच्या गोठ्यात सध्या २८ गाई ४५ कालवडी आहेत. यात दोन जर्शी गाई असून उर्वरित सर्व एच एफ जातींच्या गाई आहेत. पहाटे ५ वाजता मुक्त संचारासाठी सोडलेल्या गाई शेडमध्ये घेत त्यांचे मिल्किंग मशिनद्वारे दूध काढले जाते. त्यानंतर त्यांना टीएमआर पद्धतीने सुका चारा, हिरवी वैरण, मुरघास, खनिज मिश्रण असा एकत्रित चारा दिला जातो. त्यानंतर सायंकाळी पुन्हा हा क्रम असाच ५ पासून पुढे अवलंबला जातो.
भोसले यांना मिळणारे उत्पन्नवार्षिक साधारण १८ लाखांचा गहू भुस्सा, मका व इतर चारा खरेदी केला जातो. तसेच नियमित वार्षिक १०-१२ गाईंची विक्री केली जाते. दररोज सरासरी ३५० लिटर दूधाची श्रीरामपूर गावात ५० रुपये दराने विक्री केली जाते. यातून उरलेले दैनंदिन दुधावर प्रक्रिया करत त्यातून जवळपास १०० लिटर दुधाचे पनीर, दही, लस्सी असे पदार्थ बनवून ते हॉटेल व खाजगी ग्राहकांना विकले जाते. तसेच वार्षिक शेणखताची तीन ते चार हजार ट्रॉली प्रमाणे विक्री होते.
उच्च दूध क्षमता व चांगली वंशावळ असलेल्या गाई
अधिकाधिक गाईंचे संगोपन करण्यापेक्षा कमी गाईंतून अधिक मिळवणे काळाची गरज असल्याचे भोसले सांगतात. त्यांच्याकडे ४८ लिटर दिवसाला दूध देणारी गाय आहे. भोसले यांच्या गोठयातील गाईंना लिंगवर्धित रेतन कांडी एआय करता वापरली जाते, ज्यातून फक्त कालवडींचा जन्म होतो. वार्षिक एक वेत घेत वेळेचा तोटा कमी करून कमीत कमी गाईंपासून उच्च दुधातून ढासळलेल्या दुधाच्या दरांवर मात करता येईल असेही आशुतोष भोसले सांगतात.