Pune Farmer Success Story : पुण्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपल्या शेतात विड्यांच्या पानांची लागवड करून चांगला नफा कमावला आहे. केवळ ६ वेली नारळाच्या झाडावर चढवून त्यापासून ते महिन्याकाठी १० हजारांपेक्षा जास्त उत्पन्न घेत आहे. जिवामृताच्या वापरामुळे त्यांच्या पानाला मागणी असून त्यांच्या शेतातील विड्याची पाने थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांना बाजारात दुप्पट दर मिळतोय.
दरम्यान, भोर तालुक्यातील वेळू येथील गुलाब घुले हे मागच्या अनेक वर्षांपासून प्रयोगशील आणि विषमुक्त शेती करत आहेत. पुणे शहरातील पीएमटीमध्ये ड्रायव्हर म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी सात ते आठ वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ शेती करण्यास सुरूवात केली. सुभाष पाळेकर यांच्या पद्धतीनुसार ते शेती करत असून शेतात कोणत्याच रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. आपल्या शेतात त्यांनी विविध फळझाडांची लागवड केली आहे. ते विषमुक्त पद्धतीने पिकवलेला माल थेट ग्राहकांना विक्री करतात. सुरूवातीला शेतात असलेल्या नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ त्यांनी विड्याच्या पानाची लागवड केली होती. त्या केवळ ६ वेलींपासून ते आज चांगले अर्थार्जन करत आहेत.
लागवडनारळाच्या झाडाच्या मुळाजवळ एका फुटाच्या विड्याच्या पानाच्या कांडीची लागवड केली. यासाठी साधी, हलकी, चुनखडीची जमीनीची गरज असते. एका फुटाचा खड्डा खोदून त्यामध्ये शेणखत, पालापाचोळा, जिवामृत टाकून लागवड केली. सहा महिन्यामध्ये या वेलीची उंची साधारण पाच फुटापर्यंत झाली.
व्यवस्थापनया वेलीला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जिवामृत दिले जाते. तर वेलीला वाढण्यासाठी थेट नारळाच्या खोडाचा वापर केला आहे. या वेलीवर जिवामृत, निंबोळी अर्क, तंबाखू अर्क याची फवारणी केली जाते. वेलीच्या वाढीसाठी जिवामृत वगळता कोणतेही रासायनिक खताचा वापर केला जात नाही.
विक्री व्यवस्थागुलाब घुले यांची सर्व शेती विषमुक्त पद्धतीने पिकवली जात असल्याने अनेक ग्राहक आणि शेतकरी त्यांच्या शेतात भेट द्यायला येतात. त्यामुळे शेताच्या बांधावरूनच अनेक पाने विकली जातात. तर आठवडे बाजारात इतर भाजीपाल्यासोबत ते पानांचीही विक्री करतात. या पानांमध्ये रासायनिक खतांचा अंश नसल्याने बाजारातील पानांपेक्षा दुप्पट दर मिळतो.
उत्पन्नसात ते आठ महिन्यानंतर या वेलीपासून पाने मिळायला सुरूवात होते. सध्या ६ वेलींपासून महिन्याकाठी ते चार ते साडेचार हजार पानांची थेट आठवडे बाजारात विक्री करतात. तर थेट शेतातून घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना एक हजार पानांची विक्री करतात. महिन्याकाठी साधारण ५ हजार पानांची विक्री होते. तर एक पान २ रूपयांप्रमाणे विक्री होत असल्यामुळे गुलाब यांना केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न मिळत आहे.
ना जागा, ना खर्च तरीही चांगले उत्पन्नपानांच्या वेलीसाठी गुलाब यांनी वेगळी जागा गुंतवलेली नाही. नारळाच्या बुंध्यावरून या वेली वर गेल्या आहेत. तर या वेलीसाठी वेगळा कुठला खर्चही नसल्यामुळे शून्य खर्चातील वेली त्यांना उत्पन्न देत आहेत.
कशी गेली अमेरिकेपर्यंत पाने?विड्याच्या पानापासून मुखवास आणि इतर पदार्थ तयार केले जातात. तर विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांपासून बनवलेले पदार्थ जास्त काळ टिकतात त्यामुळे प्रक्रिया करण्यासाठी या पानांना जास्त मागणी आहे. पुण्यातील अनेक ग्राहक या पानांपासून तयार केलेला मुखवास परदेशातील मुलांना पाठवतात. आमच्या अनेक ग्राहकांनी त्यांच्या अमेरिकेतील मुलांना आमच्या पानांपासून बनवलेला मुखवास पाठवला असल्याचं गुलाब सांगतात.