Join us

कुत्रे, मांजर नव्हे तर पुण्यात वकील तरूणाने घरातच पाळली पुंगनूर जातीची देशी गाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 8:35 PM

देशी गोवंशाची गाय पाळल्याने घरात साकारात्मक उर्जा संचरते असं जगताप सांगतात.

पुणे : "लोकं कुत्रे पाळतात, मांजरं पाळतात पण मी देशी वंशाची गाय पाळतो कारण तिला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या गायींचा आम्हाला कसलाच भास नाही. उलट देशी गायींच्या सानिध्यात राहिल्यामुळे आमच्या घरात साकारात्मक उर्जा संचरते" असं मत व्यक्त केलंय पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या अभिषेक जगताप या तरूणाने. त्यांनी आपल्या घरात चक्क पुंगनूर जातीच्या दोन गाई पाळल्या आहेत. 

अनेकजण घरात सहवास किंवा आवड म्हणून कुत्रा किंवा मांजर पाळतात. काही हायब्रीड जातींच्या कुत्र्याची किंवा मांजरीची किंमत ही लाखांच्या घरातसुद्धा असते. पण पुण्यातील अभिषेक जगताप यांनी दोन गाई पाळल्या आहेत. या गाई पुंगनूर जातीच्या असून या गोवंशाची उंची केवळ अडीच ते तीन फुटापर्यंतच असते. यांच्याकडे असलेल्या गाई केवळ अडीच फूट उंचीच्या आहेत.  

अभिषेक यांच्याकडे अडीच वर्षे वयाची एक आणि दीड वर्षे वयाची एक अशा दोन गाई आहेत. या गाई त्यांच्या घरातच असतात. घरातील प्रतिनिधीप्रमाणे त्या वागतात. जेवण्यासाठी, टीव्ही बघण्यासाठी, घरातील देवपूजा करण्यासाठी आणि अगदी बेडवरसुद्धा त्या घरातील व्यक्तींसोबत असतात. घरात कोणत्याच प्रकारचा त्रास त्या देत नाहीत. लहान मुलांसोबतही या गाई खेळतात असं अभिषेक यांनी सांगितलं. 

घरात संचरते उर्जा'या गाईंमुळे घरात साकारात्मक उर्जा संचरते. माणूस कितीही थकून आला आणि लहान लेकरांसारखं गाईला गोंजारलं तरी क्षणात थकवा नाहीसा होतो आणि प्रसन्न वाटतं. घरात गाईचं सानिध्य असल्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह वातावरण असतं' असं ते म्हणतात. 

लोकं आश्चर्याने बघतातमी पुण्यातील चांगल्या सोसायटीत राहूनसुद्धा गाय पाळतो हे अनेकांना आश्चर्याचे वाटते. अनेकजण मला याबद्दल विचारणा करतात. मी या गाईंना फिरायलासुद्धा घेऊन जातो तेव्हा अनेकजण आमच्याकडे आणि गाईंकडे कौतुकाने बघतात असं ते म्हणतात. 

राधा अन् लक्ष्मी बनल्यात सेलिब्रिटीअभिषेक यांच्याकडे असलेल्या गाईंची नावे ही राधा आणि लक्ष्मी अशी आहेत. ते बाहेर खरेदीसाठी जाताना गाईंना मॉलमध्ये घेऊन जातात. मॉलमध्येसुद्धा या गाईंसोबत अनेकजण फोटो काढतात आणि कौतुकाने त्यांचे पूजन सुद्धा करतात. ते त्यांच्या गाईंना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून फिरायला सुद्धा घेऊन जातात त्यामुळे या गाई सेलिब्रिटी बनल्या आहेत. 

शेण अन् गोमुत्राला मागणीदेशी गाईंच्या शेण आणि गोमुत्राला परिसरातून चांगली मागणी असल्याचं ते सांगतात. गोमुत्रासाठी अनेक जणांनी नंबर लावले आहेत. तर गाईंचे शेण ते घरगुती झाडांना खत म्हणून वापरतात. त्याचबरोबर काही रूग्णसुद्धा गाईंच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी आमच्या घरी येतात असं त्यांनी सांगितलं आहे. घरात रोगराई नाहीमला गाईंची आवड असल्यामुळे मी गाई पाळायला सुरूवात केली पण या गाई आल्यापासून आमच्या घरात कोणतीच रोगराई आली नाही. या गाई अगदी घरातील व्यक्तीप्रमाणे आमच्यासोबत राहत असून त्यांच्यामुळे आमच्या घरात समृद्धी आल्याचं वकील अभिषेक जगताप यांनी सांगितलं आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगाय