पुणे : शेती क्षेत्रात पुढारलेल्या पुणे जिल्ह्यात अनेक तरूण यशस्वीपणे शेतीपूरक व्यवसाय करतात. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील चंद्रकांत अडसरे या अविवाहित तरूणाने नोकरीच्या पाठीमागे न लागता नर्सरी उद्योगासाठी लागणाऱ्या ट्रे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आज यशस्वीपणे ७० ते ८० लाखांची वार्षिक उलाढाल करत आहे. त्याच्या या व्यवसायाने तरूणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
चंद्रकांत अडसरे हा तरूण जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आहे. त्याने नारायणगाव येथेच अॅग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर एमबीए मार्केटिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध ठिकाणी नोकरी केली. पण नोकरी करत असताना शेतीपूरक व्यवसायामध्ये चांगला वाव आहे, आपणही हा व्यवसाय करावा अशी चंद्रकांतची इच्छा होती.
साधारण ४ वर्षांपूर्वी चंद्रकांतने केवळ एक मशिन खरेदी करून व्यवसायाची सुरूवात केली. हळूहळू व्यवसाय वाढला आणि आता चंद्रकांत यांच्याकडे ४ मशिन आणि १० ड्रायर आहेत. 'मुक्ताई सीडलींग ट्रे' या नावाने त्यांनी आपल्या व्यवसायाची ब्रँडिंग केली आहे.
व्यवस्थापनचंद्रकांत यांच्या कंपनीमध्ये चार ते पाच कामगार असून नर्सरींच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मशीनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ट्रे ची निर्मिती केली जाते. उस, भाजीपाला, फुले, झेंडू अशा विविध प्रकारच्या रोपांसाठी वेगवेगळे ट्रे तयार केले जातात. या माध्यमातून चंद्रकांत यांनी चार ते पाच कुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
विक्री आणि ब्रँडिंगचंद्रकांत यांच्या मुक्ताई सिडलिंग ट्रे कंपनीमध्ये तयार झालेला माल जुन्नर, आंबेगाव, खेड, नाशिक, सिन्नर, शिरूर, हडपसर, बारामती आणि महाराष्ट्राच्या बाहेर विक्री केला जातो. नर्सरी व्यवसायिकांसाठी ट्रे विक्री केले जातात. त्याचबरोबर मालाची क्वालिटी चांगली ठेवल्यामुळे एक ग्राहक पुन्हा आमच्याकडून माल विकत घेतो. यामुळे आपल्या व्यवसायाची आपोआपच ब्रँडिंग होते असं चंद्रकांत सांगतो.
केव्हीकेचे मार्गदर्शनया व्यवसायामध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. शेतीपूरक व्यवसायासाठी कर्जाची उपलब्धता, मार्केटिंग, विक्री आणि ब्रँडिंग करण्याच्या संदर्भात, त्याचबरोबर तांत्रिक मार्गदर्शनही केव्हीकेकडून मिळाल्याचं चंद्रकांत सांगतो.
उत्पन्नचंद्रकांत यांच्या कंपनीमधून दररोज साधारण १० ते १२ हजार ट्रे ची निर्मिती होते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर या ट्रेची विक्री केली जात असून या व्यवसायातून वर्षाकाठी ७० ते ८० लाख रूपयांची उलाढाल होत आहे. चंद्रकांत यांचा हा व्यवसाय शेतकरी तरूणांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.