उच्चशिक्षित तरुणांनी पारंपरिक शेतीला मूठमाती देत शेतीविषयी आधुनिक तंत्रज्ञान अवगत केले. त्यांनी दीड एकरात लागवड केलेल्या गोल्डन सीताफळाला तेलंगणाच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळू लागला आहे. यातून आर्थिक उन्नती साधत असल्याचे वटणवाडी येथील दोन भावंडांनी दाखवून दिले. तेलंगणातील ग्राहकांना आष्टीच्या सीताफळाची गोडी लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुष्काळी तालुका म्हणून आष्टी तालुक्याची ओळख आहे. येथील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पूर्वज पारंपरिक शेती करत असल्याने यातून आर्थिक उन्नती होत नव्हती. बी.एस्सी.बी.एड., एम.ए.बी.एड शिक्षण घेतलेले बंडू व राजेंद्र जाधव या दोन भावंडांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना कृषी अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांनी २०१८ साली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून सुपर गोल्डन जातीची सीताफळाची ६०० झाडे आणली. दीड एकर शेतात ठिंबक सिंचन करून सहा बाय बारा फूट अंतरावर लागवड केली. यासाठी औषधे, फवारणी, मजुरी असा दीड लाख रूपये खर्च केला. कुटुंबातील सदस्यांनी मेहनत करून सीताफळाची बाग बहारात आणली.जांभूळ, पेरू अन् शेवंतीची लागवड
फळबाग शेती करताना सीताफळ यासोबतच दोन एकरात जांभूळ, दीड एकरात पेरू तर एक एकरात शेवंतीची लागवड केली आहे. यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असल्याने आता आधुनिक शेतीकडे आम्ही लक्ष देत आहोत. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य मेहनत करत असल्याचेही जाधव यांनी सांगितले.
यंदा झाडांनी फळे धरल्यामुळे बाग बहरून आली आहे. सीताफळाची मागणी वाढली असून, तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथील बाजारपेठेत ४५ रुपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. यातून साधारण साडेतीन लाख रूपये उत्पन्न मिळेल, असे बंडू जाधव, राजेद्र जाधव यांनी सांगितले. त्यामुळे तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे जाधव यांनी सांगितले.