- दत्ता लवांडे
नागपूर : नागपुरातील एमबीए, इंजिनिअर, डॉक्टर अशा उच्चशिक्षित तरूणांनी एकत्र येत हायड्रोपॉनिक शेतीचा प्रयोग राबवला आहे. तरूण वयातच शेतीची आवड असल्याने पण शेती नसल्याने त्यांना हा प्रयोग सुचला असून त्यातून अर्थार्जन करण्याचा त्यांचा मानस आहे. उदय नगर स्क्वेअर जवळील माने वाडा येथील यश टिचुकले, रूख्मिणी देशमुख, अलंकार टिचुकले, अपर्णा रायकवाड, अभिलाष वर्मा, आदर्श सिंग, अभिषेक दुरूगकर व सौरभ सायरे यांनी हा प्रयोग सुरू केला असून ते एक्झोटिक भाजीपाला पिकवत आहेत. येणाऱ्या काळात रसायनमुक्त भाजीपाला पिकवण्याचा त्यांचा मानस आहे.
हा व्यवसाय तरूणांनी मिळवून उभा केला असून त्यामध्ये तीन इंजिनिअर्स, एक एमबीए, एक डॉक्टर, एक कलाकार अशी मंडळी आहेत. त्यांचं टेरेस गार्डन हे ५०० चौरस फुटाचं असून ते या ठिकाणी पूर्णपणे हायड्रोपोनिक पद्धतीने भाज्या पिकवतात. या शेतीपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची माती वापरली जात नाही तर या भाज्यांमध्ये घरगुती भाजीपाला, एक्झोटिक भाज्या जसे की. बेसिल, लेट्यूस, ब्रोकोली, मिरची, पालक, वांगे आणि टोमॅटो इत्यादींचा सामावेश आहे. या भाज्या ते कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर न करता पिकवतात हे विशेष. भारत फ्रेश नावाने त्यांनी एक स्टार्टअप सुरू केला असून त्या माध्यमातून या पालेभाज्यांची विक्री केली जाते.
मार्गदर्शन आणि प्रशिक्षणहा प्रयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ताज्या भाज्या उगवण्यासाठी त्यांनी इच्छुक असलेल्या तरूणांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये हायड्रोपॉनिक शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी, साधने, मेहनत आणि त्यातून मिळणारा नफा याची संपूर्ण माहिती दिली जाते. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी आपल्या गच्चीवर अशा प्रकारची शेती करण्याची इच्छा आहे अशा नागरिकांनी हायड्रोपोनिक शेतीची कीटही या तरूणांकडून तयार करण्यात आली आहे.
आमच्या या प्रयोगाच्या माध्यमातून आम्हाला ताज्या आणि रसायनमुक्त भाज्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील. त्याचबरोबर ज्या लोकांना अशा प्रकारची शेती करायची आहे त्या लोकांना आम्ही प्रशिक्षण आणि हायड्रोपॉनिक शेती सुरू करण्यासाठी मदत करतो. यामध्ये कोणत्याही रसायनाचा आणि मातीचा वापर केला जात नसल्याने ग्राहकांना या भाज्या फायद्याच्या ठरणार आहेत.- यश टिचुकले (युवा उद्योजक, हायड्रोपॉनिक शेती)