Join us

Success Story कांदा टोमॅटोचा तोटा निघतोय मिरचीच्या नफातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 21:17 IST

एक एकर मध्ये शेतकर्‍याने मिळविले १० लाखांचे उत्पन्न 

रविंद्र शिऊरकर 

कांदा आणि टोमॅटोसाठी अहमदनगर जिल्ह्याचा कोपरगाव तालुक्यातील रवंदे हा परिसर प्रसिद्ध आहे. मात्र आता या शिवारात मिरची, टरबूज, भाजीपाला आदी पिके देखील जोमात बहरली आहे. ज्यातून आता शेतकरी अपेक्षित उत्पन्न देखील मिळवत आहे.

मळेगाव (थडी) तालुका कोपरगाव येथील विनायक सूर्यभान दवंगे यांना एकूण ५ एकर शेती. त्यात पारंपरिक कांदा, मका, गहू, ऊस आदी पिके ते घेतात. उन्हाळी कांद्याचे एकरी १४० क्विंटल उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. यंदा ही त्यांनी ४ एकर उन्हाळ कांद्याची लागवड केली आहे. तर एक एकर क्षेत्रात पाणी टंचाई अभावी मित्राने खरेदी केलेलं मिरची आणि आंतरपीक टरबूजची १ ते ५ जानेवारी दरम्यान लागवड केली आहे. 

चार फुट बाय दीड फुट अंतरावर लागवड केलेल्या मिरची करिता माल्चिंग, एकरी ५ ट्रेलर शेणखत, योग्य व्यवस्थापन आदीच्या बळावर विनायक यांना मिरचीतून ८ ते १० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सध्या ३ लाखांचे उत्पन्न त्यांना आजघडीला अवघ्या २ ते ३ तोड्यात मिळाले असून विक्री झालेल्या मिरचीस ७० ते ७१ रूपयांचा दर त्यांना मिळालेला आहे.  

मिरचीत योग्य अंतर राखून विनायक यांनी आंतरपीक टरबूजची लागवड केली होती. ज्यातून त्यांना ९ टन टरबूजचे उत्पादन मिळाले. ज्यास ९ रुपये प्रती किलो असा दर मिळाला. हिरवी मिरची बाजारभाव नसल्यास वाळवून लाल मिरची म्हणून विकता येते. परंतु त्यातुलनेत कांदा खराब होण्याच्या भीतीने त्याची विक्रीच करावी लागते. त्यामुळे मिरची शेतकर्‍यांना फायद्याची असल्याचे विनायकराव आवर्जून सांगतात. 

भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत कोपरगाव मध्ये मिश्रफळबाग शेती 

कांद्याला दुसर्‍या पिकांची जोड हवी 

अलीकडे कांदा मोठ्या प्रमाणात उत्पादित होत आहे. मात्र बाजारदराचा समतोल साधला जात नाही. तसेच प्रतवार चांगली नसल्यास कांदा साठवणूक जिकरीचे होते. अशावेळी शेतकरी बंधूंनी कांदा पिकांस इतर पिकांची जोड दिल्यास निश्चितच त्यांना यातून फायदा होईल. - विनायक सूर्यभान दवंगे, शेतकरी, मळेगाव थडी ता. कोपरगाव 

टॅग्स :मिरचीकांदाशेतीशेतकरीफळेकोपरगाव