शेतकऱ्यांनी एकदा मनावर घेतल्यास तो काळ्या पाषाणालादेखील घाम फोडू शकतो. इतकी त्यांच्या एकीची ताकद असते. मात्र, शेतकरी एकत्र येण्याचे मनावर घेत नाहीत, ही वस्तुस्थिती असली तरी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद परिसरातील एक दोन नव्हे तर तब्बल २९० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नैसर्गिक शेती करण्याचा संकल्प केला आहे. परिसरातील शंभर एकर शेतीवर सामूहिक पद्धतीने सेंद्रिय अद्रक लागवडीची तयारी पूर्ण केली असून, त्यांच्या या प्रकल्पाची चांगलीच चर्चा होत आहे.
हसनाबाद व परिसरातील दहा खेड्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी एकत्र येत संत दयानंद नावाने शेतकरी कंपनी स्थापन केली. त्यासाठी त्यांना वॉटर ऑर्गनायझेशन या संस्थेचे मार्गदर्शन मिळाले. तांत्रिक प्रशिक्षण देत या चालू हंगामात १०० एकरावर संपूर्णतः सेंद्रिय पद्धतीची अद्रक मिरची व इतर पिकांची देखील लागवड केली जाणार असून, आद्रक लागवड सुरू केली आहे. त्यासाठी खडकी व पिंपळगाव कोलते या ठिकाणी सेंद्रिय औषध निर्मिती करण्यात येणार आहे. येथे विविध प्रकारची जैविक पद्धतीची फवारणीसाठी लागणारी औषधे, खते तयार करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आदर्श
सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची आवड असणाऱ्या शेतकऱ्यांना लागणारे औषधी, खते उपलब्ध व्हावीत, यासाठी विविध प्रकल्प राबवण्यात आले आहेत. हा प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांसह इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठीदेखील आदर्श ठरणार आहे. येत्या काळात शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीची अद्रक तसेच मिरची लोकांपर्यंत पोहोचवणार, हे नक्की आहे.
ज्या शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याची आवड आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन, बियाणे तसेच विविध जैविक पद्धतीची खते, रोपांचा पुरवठा आम्ही करणार आहोत. तसेच भाजीपाला खरेदी- विक्री आउटलेटसुद्धा या सीजनमध्ये आम्ही सुरू करणार आहोत. -काकासाहेब खरात, शेतकरी