Join us

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करत सेंद्रिय आंबा उत्पादन; हसनाबादेतील शेतकऱ्याची प्रेरणादायी यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 15:53 IST

मराठवाड्यातील शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

बाळकृष्ण रासणे

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नियोजनासह कष्टाची जोड दिली तर चांगले उत्पन्न घेता येते याची प्रचिती हसनाबादेतील शेतकरी मनोज लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करीत सेंद्रिय पद्धतीने आंबा लागवड करून उत्पादन घेतले आहे. आज लाठी यांच्या शेतातील केशर आंब्यांना गुजरातच्या बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील शेतकरी मनोज लाठी यांनी तीन एकर पडीक जमिनीत आंबा लागवड करण्याचे नियोजन केले. तीन वर्षांपूर्वी २०० बाय १२५ आकाराचे शेततळे खोदले. १४ बाय ५ फुटांवर जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून हापूस, केशर, राजापुरी जातीच्या आंब्यांची लागवड केली.

तीन वर्षे या बागेचे संगोपन लाठी आणि कुटुंबांनी केले. रासायनिक खताचा वापर न करता देशी गायींचे शेण, गोमूत्रापासून तयार झालेले सेंद्रिय खत आंब्याला देण्यात आले.

जीवामृत, दशपर्णी यांची फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळाले. यावर्षी त्यांना उत्पादन सुरू झाले असून, गुजरात येथे तीन लाख रुपयांचा केशर आंबा विक्री झाला आहे. त्यासाठी ५० हजार रुपयांचा खर्च लाठी यांना आला. आंबा पिकविण्यासाठीही नैसर्गिक प्रक्रिया अवलंबण्यात आल्याचे लाठी सांगतात.

जर्मन, इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग जोपासली आहे. मराठवाड्यातील विविध शहरांसह गुजरातच्या बाजारपेठेतही आंब्यांची विक्री झाली आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध साधनांचा वापर करून पाणी, खतांचे नियोजन करून शेती केली तर चांगले उत्पन्न हाती येईल. - मनोज लाठी, शेतकरी, हसनाबाद.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :आंबाशेतकरीशेतीमराठवाडाविदर्भफळेजर्मनीइस्रायलफलोत्पादनशेती क्षेत्र