Join us

नोकरीपेक्षा गड्या आपली शेतीच भारी! शिमला मिरचीच्या पिकातून तरूणाची आर्थिक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 6:52 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे यांनी हा प्रयोग केला आहे.

-रविंद्र शिऊरकर

परिस्थितीशी झुंजत नोकरीच्या लाचारीपेक्षा शेतीत जोरदार मेहनत केली तर शंभरचे लाख होतात असा आत्मविश्वास बाळगत शेडनेटच्या माध्यमातून शिमला मिरचीचे विक्रमी उत्पादन घेत तरुणाने शिमला मिरचीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे यांनी हा प्रयोग केला आहे.

खांडगौर यांची गावाच्या बाजूलाच असलेल्या तलावाच्या काठी ३ एकर मुरमाड शेती असून ते पारंपरिक पद्धतीने कपाशी, तूर, भुईमूग, ज्वारी, मका ही पिके घेत असत. मात्र, उच्चशिक्षण घेऊन आणि अनेकदा प्रयत्न करूनही स्पर्धा परीक्षेत यश न आल्याने त्यांनी शेती करायचे ठरवले. यातून त्यांनी २०२२ मध्ये एक एकर क्षेत्रावर शेडनेड उभारले. ज्यात लाल पिवळी शिमला मिर्चीचे त्यांनी पहिल्यांदा उत्पादन घेतले. मात्र, बाजारभाव आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे हा पहिला प्रयत्न फक्त उत्पादन खर्च काढू शकला. 

पहिल्याच प्रयत्नातून आलेल्या अपयशातून त्यांना मोठा धडा शिकायला मिळाला. पुढे त्यांनी सोशल मीडियाद्वारे विविध शेती तज्ज्ञांशी संपर्क करत आज शिमला मिरची पिकामध्ये यशस्वी वाटचाल सुरु केली आहे. नाशिक व पनवेल येथील बाजारात त्यांची शिमला विक्री होत असून परिसरातील व्यापारी जागेवर खरेदी करत असल्याने विक्रीच्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे शिमला मिरचीची शेती यशस्वी होत आहे. 

गांडूळ खत युनिट

एक-एक एकरचे दोन शेडनेट २०२२ मध्ये एका शेडनेट पासून सुरु केलेली शिमला शेती आज दोन शेडनेट मध्ये आहे. यातील एका शेडनेट मध्ये सध्या तणांचे नियंत्रण रहावे म्हणून मल्चिंग वर नुकतीच २० दिवसांपूर्वी प्लेडियन जातीच्या १५००० रोपांची लागवड केली आहे. तर दुसऱ्या शेडनेट मध्ये मल्चिंगचा वापर करत काकडी लागवड तयारी सुरु आहे. 

आर्थिक लाभाचे गणित शिमला मिरचीची लागवड केल्यानंतर ४५ दिवसांपासून पुढे दर आठ दिवसाला एक तोडा मिळतो. २ ते ३ टन उत्पादन या एका तोड्यात मिळत असून बाजारभावानुसार उत्पन्न मिळते. सध्या शिमला मिरचीला ४० ते ४५ रुपये दर असून अजित यांनी गेल्या वर्षी ९०  ते ९५ रुपये दराने देखील शिमला विक्री केलेली आहे. सरासरी प्रति किलो १५ रूपयांचा खर्च वजा जाता वार्षिक ३ ते ५ लाख उत्पन्न शिमला मधून मिळत असल्याचे अजित खांडगौरे सांगतात. 

थ्रिप्स व बुरशी किटकांचा शिमला मिरचीला धोकाशिमला मिरचीला बुरशी जन्य किटकांचा व थ्रिप्सचा मोठा धोका असून त्यांचे प्रमाण वाढल्यास पूर्ण शिमला बाधित होऊन मोठे नुकसान होते. यासाठी पूर्ण लक्ष ठेवत निगराणी करावी लागते तसेच काही किटकांचा प्रादुर्भाव दिसल्यास लगेच फवारणी घ्यावी लागते. 

गांडूळ खत युनिट अजित हे आधी शेडनेटमधील पिकांना शेणखत विकत घेऊन टाकत असत. पण त्यांनी यंदा याच खतापासून गांडूळ खत निर्मिती युनिट उभारले असून या मध्ये १२×४×२ आकाराचे एकूण २० बेड आहे. ज्यामध्ये ८ ट्रॉली शेणखत विकत घेऊन सोबत मक्का चाऱ्याची कुट्टी चा थर देत प्रती बेड ३ किलो गांडूळ सोडले आहे. यामधून ३-४ महिन्यात उच्च दर्जाचे गांडूळ खत मिळेल व त्याद्वारे पुढील पिकांस अधिकाधिक फायदा होईल असे अजित सांगतात.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी