शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी हे शेतीमधील भविष्य असणार आहे. येणाऱ्या काळात एकट्या शेतकऱ्याला शेतीमाल व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था उभ्या करणं अवघड होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटाला अनुदान आणि योजनांमध्ये सवलती देण्यात येतात. सरकारने हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर आत्मा अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी गटाची नोंदणी केली. काही शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. त्यातील अनेक गट आणि कंपन्या फक्त नावापुरत्या आणि अनुदान घेण्यापुरत्या राहिल्या. नंतरच्या काळात अनेक गटाचं काम बंद पडलं, कंपन्यांचं काम बंद पडलं पण राज्यात असा एक गट आहे जो राज्यातील सर्वांत जुना शेतकरी गट म्हणून ओळखला जातो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील प्रतिष्ठित आणि प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी यांनी २००० साली या गटाची स्थापना केली होती. शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्याची त्यावेळी कोणतीच व्यवस्था नव्हती त्यामुळे या गटाची नोंद कुठेच नव्हती पण त्यांचे काम जोमाने सुरू होते. सुरूवातील त्यांनी मोसंबी या पिकामध्ये काम सुरू केले आणि गावाचं अर्थकारण हळूहळू बदलू लागलं. पुढे २०१० साली कृषी विभागाच्या आत्माने शेतकरी गटाचा प्रकल्प हाती घेतला. त्या अंतर्गत या शेतकऱ्यांनी 'जय जवान जय किसान' या शेतकरी गटाची स्थापना केली.
गटाने गावामध्ये केलेल्या आर्थिक बदलामुळे शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. पुढे गटाचे काम पाहून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गावात भेटी दिल्या. शेतीमधील उत्पन्नाचे साधन दिसल्यामुळे शेतकऱ्यांना बँकाकडून सहज कर्ज मिळू लागली. त्याचबरोबर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या योजना आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. यातून फळबाग लागवड, शेततळे, विहिरी, सौरउर्जा, वनशेती अशा योजनेंमार्फत शेतीतील पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या.
आज घडीला देवगावचे अर्थकारण बदलले असून सर्व शेतकऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून उन्नती साधली आहे. रेशीम शेतीच्या माध्यमातून या गावातील अनेकजण लाखोंची कमाई करत असून या प्रगतशील शेतकऱ्यांमुळे गावाचे रूपडे बदलले आहे.
'आम्ही योजनांपर्यंत पोहोचलो'सुरूवातील सरकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत येत नव्हत्या पण सरकारी योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही सरकारपर्यंत पोहोचलो. नव्या योजनांची माहिती करून घेतली आणि त्या योजनेचा लाभ घेतला. आमच्या गावातील रोजगार सेवकही रोजगार हमी योजनेंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देतात. विशेष म्हणजे गटातील शेतकऱ्यांची एकमेकांना साथ असल्यामुळे प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला असल्याचं देवगावचे सध्याचे सरपंच योगेश कोठुळे यांनी सांगितले.
कृषी विभागाच्या योजना राबवण्यास मदतहा शेतकरी गट केवळ सरकारी योजनेसाठी नाही तर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगती करण्यासाठी बनवलेला आहे. त्यामुळे हे शेतकरी अनुदानाचे पैसे घेण्यासाठी नव्हे तर दूरदृष्टी ठेवून योजनांचा लाभ घेतात. त्यामुळे सरकारी यंत्रणांना योजना राबवणे सोपे झाले.
गावात सर्व कुटुबांनी घेतला योजनेचा लाभविशेष म्हणजे या गावात गटशेतीमध्ये ज्या प्रकारे अर्थकारण बदलले त्याचप्रकारे येथील शेतकऱ्यांनी आणि गावातील सर्व नागरिकांनी मनरेगा अंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ घेतला आहे. साधारण ३०० घरे असलेल्या या गावामधील संपूर्ण कुटुबांनी कृषी विभाग किंवा मनरेगा अंतर्गत येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभ घेतल्याचं येथील सरपंच योगेश कोठुळे आणि रोजगार सेवक मदन बोंद्रे यांनी सांगितले.
सकारात्मकतासरकारी योजना आणि प्रशासनाविरोधात बोलण्यापेक्षा आपण योजनांची माहिती घेऊन त्या मिळवल्या पाहिजेत. आपल्यातील कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या अनेक योजना आहेत पण शेतकरी कमी पडतात त्यामुळे आपण मागे आहोत असं येथील प्रगतशील शेतकरी दीपक जोशी ठणकावून सांगतात. आपण जर साकारात्मक विचार केला तर केवळ अनुदान आणि सरकारी योजनां साथीने शेतकरी प्रगती करेल, फक्त त्याचा लाभ घेतला पाहिजे असं ते म्हणतात.
कृषी विभाग, राष्ट्रीय कंपन्या, संस्थांचे सहकार्यया गटाच्या यशामध्ये कृषी विभागाच्या योजनांचा आणि अनुदानाचा मोठा फायदा झाला. यामध्ये रेशीम विभाग, कृषी विभाग, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विज्ञान केंद्र १, छत्रपती संभाजीनगर, आरसीएफ, इफको किंवा मैत्री आणि आपुलकी सारख्या खासगी संस्थांचा या गटाच्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचं येथील शेतकरी सांगतात. गावातल्या एका गरीब घरातील शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी मैत्री संस्थेने कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता आर्थिक मदत केली. आणि आपुलकी संस्थेने देवगावमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. त्याचबरोबर वेळोवेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनीही मदत केली.
गटाला आणि शेतकऱ्यांना मिळालेले पुरस्कारदेवगाव येथील जय जवान जय किसान शेतकरी गटाने आणि शेतकऱ्यांनी केलेले उल्लेखनीय काम पाहून आयसीआरने देशपातळीवरील दहा लाखांमध्ये उत्पन्न असलेल्या 'लखपती शेतकरी पुरस्कारा'साठी सदाशिव गिते या शेतकऱ्याची निवड केली. हा पुरस्कार २०२३ मध्ये देण्यात आला. त्याचबरोबर आयसीआरच्या पुसा इंस्टिट्युटमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते शेतकरी सदाशिव गिते आणि शहादेव ढाकणे यांचा सन्मान करण्यात आला. या शेतकऱ्यांची निवडही कृषी विभागाकडून करण्यात आली होती.
जय जवान शेतकरी गटाला आणि गटातील शेतकऱ्यांना मिळालेले वैयक्तिक पुरस्कार
- शहादेव ढाकणे - प्रगतीशील किसान पुरस्कार, आरसीएफ २०२२
- दीपक जोशी - प्रगतीशील किसान पुरस्कार, आरसीएफ २०१५
- दीपक जोशी - प्रगतशील शेतकरी पुरस्कार, इफको २०१७
- दीपक जोशी - कृषी माऊली पुरस्कार, स्वामी समर्थ मंडळ, दिंडोरी, २०१५
- दीपक जोशी - शेतकरी राजा पुरस्कार, (शिरोळ येथील गावकऱ्यांकडून राजू शेट्टी यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो)
- सदाशिव गिते - सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, अॅग्रोवन
- सदाशिव गिते - सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, कृषी विभाग, छत्रपती संभाजीनगर
- शेतकरी गट - राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवी गट, यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई
- शेतकरी गट - उत्कृष्ट शेतकरी गट, कृषी सन्मान फाऊंडेशन पुणे
इ.स. १९८४ साली मी पदवीधर झाल्यानंतर गावाकडे शेती करण्यासाठी आलो. पुढे २००० साली समविचारी शेतकऱ्यांचा गट सुरू केला. पुढे सरकारी योजनेंची, अनुदानाची आणि तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करून शेती सक्षम केली. आमच्या गटामध्ये सगळे शेतकरी एकमेकांना मदत करतात. या सर्व शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि मनरेगा अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनेंचा लाभ घेतला आहे. - दीपक जोशी (प्रगतशील शेतकरी, जय जवान जय किसान शेतकरी गट)