पैठण : मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी दुष्काळामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा आपण ऐकलं असेल. पण याच मराठवाड्यामध्ये जिद्दीने, चिकाटीने शेती करणारे शेतकरीही आपल्याला बघायला मिळतात. कितीही संकटं आले तरी विविध प्रयोग करून शेतीमध्ये नवे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असते. तीच क्षमता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील शेतकरी ज्ञानदेव ढाकणे यांनी दाखवून दिली आहे.
त्यांनी आपल्या केवळ एक एकर हंगामी बागायती आणि अर्धे वर्षे कोरडवाहू शेतीमध्ये रेशीम शेती आणि त्याला जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधली आहे. त्यांचा मुलगा पुणे येथील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला असून त्यांच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा याच कोरडवाहू शेतीतील आर्थिक उत्पन्नातून केला जात आहे. दुष्काळी मराठवाड्यातील आणि केवळ एक एकर शेती असलेल्या ज्ञानदेव ढाकणे यांची ही कहाणी...
पैठण तालुक्यातील बराचसा भाग गोदावरी नदीच्या खोऱ्यातील तर काही भाग दुष्काळ आणि कमी पावसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. कमी पावसाच्या परिसरामध्ये बऱ्यापैकी दुष्काळी परिस्थिती असते. रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची कमतरता या भागात भासते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून होणाऱ्या आर्थिक उत्पन्नापासून मुकावे लागते. पण पैठण तालुक्यातील देवगाव येथील ज्ञानदेव ढाकणे यांनी केवळ एक एकर हंगामी बागायती शेतीमध्ये रेशीम शेती करून चांगले उत्पन्न मिळवले आहे.
देवगाव शिवारात ढाकणे यांना वडिलोपार्जित केवळ एक एकर शेती आहे. पुढे त्यांनी सामाईक विहीर खोदली पण पावसाच्या कमतरतेमुळे विहिरीचे पाणीही लवकरच कमी होते. वडिलोपार्जित जमिनीत पारंपारिक शेती करत असताना त्यांनी रेशीम शेतीची जोड शेतीला दिली. गावातीलच काही शेतकरी रेशीम शेतीमधून चांगले उत्पन्न कमावत असल्यामुळे त्यांनाही रेशीम शेतीची आवड निर्माण झाली.
त्यानंतर त्यांनी घरीच बेणे तयार करण्याचे ठरवले व कुटुंबाचा सल्ला आणि साथ घेऊन ८ हजार रोपे घरीच तयार करून आपल्या शेतीमध्ये लागवड केली. पुढे त्यांनी सुमारे ४ हजार रोपे विक्री केली आणि यातून त्यांना चांगला नफा मिळाला. पुढे रेशीम शेती करण्यासाठी त्यांच्याकडे शेड उभारणीसाठी पैसे नसल्यामुळे त्यांना पहिली बॅच घेता आली नाही. त्यानंतर त्यांनी कमी बजेटमध्ये घरीच शेड उभारणीला सुरुवात केली व एका वर्षात पाच बॅच घेतल्या यामधून त्यांना अंदाजे दोन लाखापर्यंतचे उत्पन्न मिळाले.
जोडव्यवसाय म्हणून शेळीपालन
शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले असून त्यांच्याकडे सध्या पाच शेळ्या आणि त्यांचे करडे आहेत. ज्यावेळी पैशांची गरज भासते त्यावेळी ते करडांची विक्री करतात. त्यांचे शेळीपालन हे बंदिस्त पद्धतीचे असल्यामुळे त्यांना जास्त वेळ देण्याची गरज नसते. शेतातीलच तुतीचा पाला ते शेळ्यांसाठी वापरतात त्यामुळे त्यांचा खर्चही कमी होतो.
मुलाच्या शिक्षणाचाही खर्च शेतीतूनच
ढाकणे यांचा मुलगा प्रितम हा पुण्यातील सीओईपी म्हणजेच अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे एमटेकचे शिक्षण घेत असून त्याला वर्षाकाठी १ लाख ५० हजार रुपयांचा खर्च येतो. त्याच्या कॉलेजचा सर्व खर्च केवळ एक एकर शेतीमध्ये केलेल्या प्रयोगातून केला जातो. तर शेती व्यवसाय करत असताना अजूनही वेगवेगळे प्रयोग करण्याचा मानस ज्ञानदेव ढाकणे यांचा आहे.
कमी क्षेत्र असूनही 'आत्मनिर्भर'
रेशीम शेतीला शेळीपालनाची जोड दिल्यामुळे ढाकणे कुटुंबियांची मजुरी बंद झाली. पारंपारिक पिकांमुळे उत्पन्न होत नव्हते पण रेशीम आणि शेळीपालनाच्या प्रयोगामुळे देवगाव मध्ये अल्पभूधारक पण एक आदर्श आणि आत्मनिर्भर कुटुंब म्हणून गावात ते सन्मानाने आयुष्य जगत आहेत.
शेती व्यवसाय करत असताना कितीही संकटे आले तरी प्रत्येक शेतकऱ्याने महापूर आल्यानंतर ज्याप्रमाणे लव्हाळ नावाचे तण ताठ मानेने उभे राहते त्याप्रमाणे संकटाशी दोन हात केले पाहिजेत आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे असं ज्ञानदेव ढाकणे सांगतात.