कंट्रोल फार्मिंगमुळे बदलत्या वातावरणावर मात करून चांगले नफा कमावता येतो हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध केलंय. जुन्नर तालुक्यातील थोरंदळे येथील शेतकरी वसंत पिंपळे यांनी ९० गुंठ्यातील पॉलिहाऊसमध्ये पालक लागवड केली आणि थेट मॉलला विक्री करून चांगला आर्थिक नफा कमावला आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा शेती क्षेत्रात पुढारलेला तालुका. येथील शेतकरी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिके आणि फळपिके घेतात. नाशिक, पुणे आणि नवी मुंबई बाजारपेठ जवळ असल्याने येथील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळतो. त्याचबरोबर काही शेतकरी थेट सुपर मार्केट, मॉल आणि मोठमोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना थेट माल देतात.
दरम्यान, वसंत पिंपळे यांची जुन्नर तालुक्यातील थोरंदळे येथे शेती आहे. त्यांचे ४५ - ४५ गुंठ्यात दोन पॉलिहाऊस आहेत. त्यांनी मागच्या दीड महिन्यापूर्वी या दोन्ही पॉलिहाऊसमध्ये पालकची लागवड केली आहे. पालक लागवड केल्यानंतर एका महिन्यात पालक काढणीला येते. त्यानंतर प्रत्येकी १५ दिवसानंतर पालकची काढणी करावी लागते.
व्यवस्थापन
पॉलिहाऊसमुळे बदलत्या वातावरणावर नियंत्रण करता येते. तर कीड आणि रोगांवरही नियंत्रण ठेवता येते. ओपन फार्मिंगच्या तुलनेत पॉलिहाऊसमधील शेती फायद्याची ठरते. पावसाळ्याचे दिवस असतानाही कंट्रोल फार्मिंगमुळे पालक चांगली राहते. ड्रीपद्वारे पाणी आणि वॉटर सोल्यूबल खते सोडली जातात आणि रोगांचा प्रादुर्भाव झाला नसला तरीही फवारणी शेड्यूलनुसार केली जाते.
विक्री
पिंपळे हे आपल्या संपूर्ण शेतमालाची विक्री थेट कलेक्शन सेंटरवर करतात. हा माल थेट मॉलमध्ये विक्रीसाठी जात असल्यामुळे या मालाची विक्री करण्यासाचे संकट राहत नाही. पिंपळे आपल्या शेतातील झेंडू, गवती चहा, पपई, डाळिंब आणि इतर शेतमाल थेट विक्री करतात. यामुळे दरही चांगला मिळतो.
दराची शाश्वतता
पिंपळे यांनी पालक विक्रीसाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी पिंपळे यांना पॅकिंगचे सर्व सामान पुरवते. कंपनीच्या मागणीनुसार २०० ग्रॅम प्रमाणे पालकची पॅकिंग केली जाते. एका किलोला ८० रूपयांचा दर ठरलेला आहे. पॅकिंग करताना कंपनीचे कर्मचारी शेतावर हजर असतात, त्यामुळे कंपनीला हवी तशी पॅकिंग केली जाते आणि माल थेट विक्रीसाठी पाठवला जातो. करार केल्यामुळे दराची शाश्वतता मिळाली आहे.
उत्पन्न
पिंपळे यांच्या ४५-४५ गुंठ्यात असलेल्या दोन पॉलिहाऊसमधील पालकची काढणी सुरू झालेली आहे. दोन्ही पॉलिहाऊसमधील पहिली हार्वेस्टिंग ही साडेचार टन एवढी झाली. थेट मॉलमध्ये पालकला ८० रूपये किलोप्रमाणे दर मिळत असल्यामुळे पहिल्या हार्वेस्टिंमधून ३ लाख ६० हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. तर पुढील सहा महिने पालकची हार्वेस्टिंग सुरू असून यातून त्यांना ५२ लाख रूपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तर १० ते १२ लाखांचा खर्च वजा जाता यातून त्यांना ४० लाखांचा निव्वळ नफा राहण्याची अपेक्षा आहे.