सुनील डोळसे
पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला जोडधंदा म्हणून आता अनेक शेतकरी दुग्ध व्यवसाय करीत आहेत. यातून महिनाकाठी मोठे उत्पन्न मिळत आहे. असा प्रयोग जालना तालुक्यातील निधोना परिसरातील डॉ. आंबेडकरनगर येथील शेतकरी तुकाराम शहापूरकर यांनी केला असून, ४० पंढरपुरी म्हशींच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातून महिनाकाठी साडेचार लाखांची कमाई करीत आहेत. शहापूरकर यांनी केवळ शेतीच्या भरवशावर न थांबता शेतकऱ्यांनी वेगळा व्यवसाय करण्याचा संदेश यातून दिला आहे.
निधोना परिसरातील डॉ. आंबेडकरनगर येथील शेतकरी शहापूरकर यांच्याकडे १८ एकर शेती आहे. घरातील चार जण शेतीमध्ये काबाडकष्ट करतात. मात्र, कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. त्यातून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे नेहमीचे चित्र बदलायचे म्हणून शहापूरकर यांनी सुरुवातीला एक म्हैस विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला.
आजघडीला त्यांच्या जवळ ४० म्हशी असून, त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीचा गोठाही उभारला आहे. त्यासाठी ४० म्हशींना दिवसभरात ओला चारा, पेंड, मुरघास यावर चार हजार रुपये खर्च येतो. हा खर्च वगळता दिवसाला म्हशींच्या दुधातून शेतकऱ्यास १५ हजार रुपये, तर महिनाकाठी साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळते.
२५० लिटर दूध मिळते एका दिवसाला
गोठ्यातील ४० म्हशींचे सकाळी १५० आणि सायंकाळी १०० लिटर दूध मिळते. हे दूध मोटारसायकलद्वारे जालना शहरातील विविध हॉटेल आणि घरोघरी जाऊन विकले जाते. एक लिटर दुधाला ६० ते ७० रुपये भाव मिळतो. त्यामुळे २५० लिटर दुधातून एका दिवसात १५ हजार रुपयांची कमाई होते. - तुकाराम शहापूरकर, शेतकरी
म्हशींसाठी उभारला आधुनिक गोठा
१. पंढरपुरी जातीच्या ४० म्हशी आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून पत्र्यांचे शेड बांधण्यात आले आहे. त्यात १० पंखे लावण्यात आले आहेत.
२. म्हशींची काळजी घेण्यासाठी घरातील ४ व्यक्ती दिवसभर राबतात. सकाळी ५ वाजेपासून शेण काढणे, कडबा कुट्टी करणे, चारा टाकणे, गोठ्याची व जनावरांची साफसफाई करण्याला अधिक महत्त्व दिले जाते.
३. या म्हशींना एका दिवसाला १०० पेंढी चारा व एक क्विंटल ढेप लागते. त्यासाठी रोज चार हजार रुपये खर्च येतो.
हेही वाचा : बुरशीजन्य चारा ठरू शकतो जंतांच्या प्रादुर्भावास पोषक