महेश कणजे
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गिरीधर बोडके यांनी पपई फळबागेची लागवड केली आहे. सध्या ही बाग बहरली असून, वलांडी बाजारपेठेत या फळास ४० रुपये प्रति किलो असा दर मिळत असून, यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. फळबाग लागवडीतून अर्थकारण साधल्याने त्यांची बाग पाहण्यासाठी शेतकरी येत आहेत.
देवणी तालुक्यातील धनेगाव बॅरेजच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या धनगरवाडी शिवारात बॅरेजमुळे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली. शेतकऱ्यांनी ऊस, केळी या पारंपरिक फळबाग लागवडीसह आता पपई लागवडीचा प्रयोग ही यशस्वी होताना दिसत आहे.
धनगरवाडीच्या गिरीधर बोडके यांना एकूण दहा एकर शेती असून, पारंपरिक पिकाबरोबर त्यांनी चार एकर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ४०० रोपाची लागवड केली. गेल्या जुलै महिन्यापासून पपईच्या तोडणीस प्रारंभ झाला. आत्तापर्यंत साडेचार लाखाचे उत्पन्न घेण्यात आले आहे. पपईचे पीक हे पंधरा महिन्याचे असून, अजून आठ लाखाची उत्पन्न अपेक्षित आहे.
किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपयांचा भाव मिळत असला तरी मुंबई, पुणे, नागपूर व सोलापूर, निलंगा येथील व्यापाऱ्याकडून ठोक स्वरूपात २५ ते ३० रुपयाचा भाव मिळत आहे. नाविण्यपूर्ण प्रयोग राबवून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. बागेची पाहणी करण्यासाठी शेतकरी येत आहेत
शेतीकामासाठी कुटुंबीयांनी पाठबळ दिले...
■ शेतीत सध्या मजुरांची समस्या सर्वाधिक आहे. गिरीधर बोडके व त्यांची दोन मुले राम बोडके व लिबराज बोडके यांच्या मदतीने त्यांनी गेल्यावर्षी जांभूळ, चिकू, लिंबू, आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. त्यांच्याकडून अनेक शेतकऱ्यांनी माहिती घेऊन आपल्या शेतातही या नवनवीन फळबाग लागवडीचा प्रयत्न करीत आहेत.
■ यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या पावसामुळे व धनेगाव बॅरेजचे बॅकवॉटरचे पाणी फळबागेत घुसल्याने फळबागेत पाणी साचून प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने याचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी गिरीधर बोडके यांनी केली आहे.