ॲग्रो टुरिझम हे केवळ पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर या माध्यमातून ग्रामीण संस्कृती, परंपरेचं दर्शन आणि स्थानिक सामाजिक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा मार्ग आहे हे मनोज हडवळे यांनी सिद्ध करून दाखवलंय. पराशर ॲग्रो टुरिझम या त्यांच्या कृषी पर्यटनाने आज जगात नाव लौकिक केलंय. त्यांच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण घटकाला आर्थिक फायदा होत असून हे ॲग्रो टुरिझम उत्कृष्ट 'कम्युनिटी मॉडेल' म्हणून जगासमोर येत आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा तसा कृषी क्षेत्रात पुढारलेला तालुका. बाजारपेठा जवळ असल्याने या तालुक्यातील शेतकरी शेतात विविध भाजीपाला, फळपीके घेतात. येथीलच राजुरी हे मनोज हडवळे यांचे गाव. महाविद्यालयात बीएससी ॲग्रीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्टेट बँकेत नोकरी केली. वर्धा येथे नोकरीला असतानाही त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. पण शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी कृषी पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.
साधारण १५ वर्षापूर्वी त्यांनी गावातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन कृषी आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन पर्यटकांना घडवण्यासाठी कम्युनिटी मॉडेल विकसित केले. गावातीलच एका पडीक जमिनीवर हा प्रकल्प उभा करण्याचे ठरवले आणि पुढे आद्य कृषी संस्थापक पराशर ऋषींच्या नावाने 'पराशर ॲग्रो कल्चर टुरिझम' या कृषी पर्यटनाची सुरूवात केली. २०११ साली त्यांनी पहिल्यांदा गावात द्राक्ष महोत्सव सुरू केला. या महोत्सवाला राज्यभरातील ग्राहकांनी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
हे मॉडेल जसंजसं लोकांना माहिती होत होतं त्याप्रमाणे पर्यटकांचा प्रतिसाद वाढत राहिला. बघता बघता राज्य, देश आणि जगातील पर्यटकांना राजुरी या छोट्याशा गावात यायला 'पराशर'ने भाग पाडले. आत्तापर्यंत पराशर ॲग्रो टुरिझमला २३ देशांतील पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर भारत समजून घेण्यासाठी, ग्रामीण संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी, 'स्व'चा शोध घेण्यासाठी पर्यटक इथे येतात.
काय आहे कम्युनिटी मॉडेल?
एखाद्या प्रकल्पामधून केवळ आर्थिक फायदा समोर न ठेवता प्रकल्पाच्या विकासामध्ये आजूबाजूच्या स्थानिक लोकांना सामावून घेत, त्यांच्या वेगवेगळ्या शैली, परंपरा, संस्कृतीचे पर्यटकांना दर्शन घडवले जाते. प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय, कार्य, वस्तू, स्वभाव, राहणीमान समजून घेण्याची संधी पर्यटकांना मिळते आणि परिणामी या सर्व घटकाला त्याचा आर्थिक फायदा होतो. अशा प्रकारे व्यवसायात सामाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेत त्यांचाही फायदा करून देणे म्हणजे कम्युनिटी मॉडेल होय.
कसा होतो पर्यटकांचे ग्रामीण घटकांशी व्यवहार?
पराशर ॲग्रो टुरिझम मध्ये आलेल्या पर्यटकांना गावातील आठवडे बाजार दाखवला जातो. त्याचबरोबर गावातील १० हजार पुस्तकांचे ग्रंथालय, गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, गावातील मंदीर, सभागृह, ग्रामीण व्यवसाय, हॉटेल्स, डोंगर असे विविध ठिकाणे दाखवले जातात. त्याचबरोबर गावातीलच बैलगाडीतून त्यांना फेकफटका मारता येतो. अनेक पर्यटक गावातील बाजारातून, हॉटेल्समधून वस्तू, त्याचबरोबर गावातील महिलांनी हाताने बनवलेल्या गोधडी, वाळवणाचे पदार्थ आणि इतर वस्तू खरेदी करतात. यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली आहे.
राज्यातील पहिले पर्यटन प्रशिक्षक
राज्य सरकारने कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन आदेश काढला होता. या आदेशाला शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारने पर्यटन प्रशिक्षक हे पद निर्माण केले आणि मनोज हडवळे यांना राज्याचा पहिला पर्यटन प्रशिक्षक होण्याचा मान मिळाला. या माध्यमातून त्यांनी कृषी पर्यटनाची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली.
ग्रामीण संस्कृती जपण्याचा प्रयत्न
पराशर ॲग्रो टुरिझम येथे ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होते. येथे जुन्या काळातील शेतीसाठी वापरले जाणारे औजारे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू, देशी बियाणे, मातीच्या वस्तू, वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, जुन्या काळात जनावरांसाठी वापरले जाणाऱ्या विविध वस्तूंचे संग्रहालय आहे. त्याचबरोबर जगभरातील विविध पुस्तकांचे भव्य ग्रंथालय येथे आहे.
जेवणामध्येही ग्रामीण भागांतील चविष्ठ पदार्थांचा सामावेश असल्यामुळे पर्यटकांचा ओढा जास्त असतो. पर्यटकांना जात्यावर दळण दळणे, पाट्यावर वाटण वाटणे, भाकरी करणे आणि इतर ग्रामीण भागातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. कुडाचे घरे, त्याला बांबूच्या लाकडाच्या खिडक्या, त्याचबरोबर गवताचे छत असलेले पर्यावरण पूरक घरे इथे पाहायला मिळतात.
पराशर हा एक विचार
'पराशर' हा केवळ आर्थिक जोड देऊन उभा केलेला प्रकल्प नाही तर हा मातीशी जुळण्याचा, आपल्या ताटातील अन्नाचा स्त्रोत उमजून घेण्याचा, त्याच्यासाठी लागलेल्या मेहनतीचा आदर करण्याचा, ग्रामीण संस्कृतीला, परंपरेला अनुभवण्याचा आणि स्वतःचा शोध घेण्यासाठीचा विचार आहे असं मनोज सांगतात. कृषी या संज्ञेची ओळख विद्यार्थ्यांना लहान वयातच व्हावी यासाठी त्यांनी 'शेतीशाळा' नावाची एक चळवळ सुरू केलीये. येणाऱ्या काळात मुलांना शेतीशी नाळ जुळवून ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचं ते म्हणतात.