Join us

Pearl Farming: युवा शेतकरी घरीच शिंपल्यात पिकविताे चमकदार माेती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:29 PM

Pearl Farming: मोत्यांची शेती करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील या तरुण शेतकऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

गाेपाल लाजूरकर

गडचिराेली : लाेकापवादाचे भय न बाळगता स्वकर्तृत्वाने काहीतरी नवीन करण्याची आसक्ती बाळगणारे विरळच. मनाशी खूणगाठ बांधून ध्येय पूर्णत्वास जाईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत. असेच ध्येय पारडी (कुपी) येथील युवा शेतकरी संजय मुखरू गंडाटे यांनी १२ वर्षांपूर्वी पाहिले अन् गाेड्या पाण्यात शिंपल्यांत माेती संवर्धन सुरू केले. त्यांची माेत्याची शेती आता विस्तारली आहे. मागील वर्षी त्यांनी अंगणातील विटा-सिमेंटच्या टाक्यांमध्ये ३ हजार २०० शिंपल्यात माेती संवर्धन केले. पुढील वर्षभरात त्यांना माेतीचे उत्पादन मिळेल. याशिवाय त्यांनी घरीच शेळीपालनासह शेतात फळबाग, चंदन, सागवानाचीही लागवड केलेली आहे. या बहुरंगी शेतीतून ते आर्थिक उत्पन्न मिळवित आहेत.

पारडी येथील शेतकरी संजय गंटाटे हे बी.ए., एलएल.बी आहेत. यांनी १२ वर्षांपूर्वी गाेड्या पाण्यात माेती संवर्धन सुरू केले. सुरुवातीला दुसऱ्यांच्या शेततळ्यात त्यांनी माेती संवर्धन केले; परंतु हा प्रयाेग फसल्यानंतर त्यांनी घरीच सुरुवातीला १० बाय १५ लांबी-रुंदी व ७ फुटाचे खाेल सिमेंट टाके निर्माण केले. यात शिंपल्यामध्ये माेती संवर्धन सुरू केले. तेव्हापासून त्यांची आर्थिक भरभराट झाली. यातून त्यांना ‘आर्थिक बाेध’ मिळाला व घराजवळच दुसऱ्या व्यक्तीकडून जागा खरेदी करून तेथे १६ बाय १६, १५ बाय ११ लांबी-रुंदी व १५ फूट खाेलीचे सिमेंट टाके तयार केले. सध्या या तिन्ही टाक्यांमध्ये माेती संवर्धन केलेले आहे.

दाेन वर्षांत माेतीचे उत्पादन विशिष्ट आकाराचा मिश्र धातूपासून बनविलेला स्थायू पदार्थ जिवंत शिंपल्यांमध्ये साेडला जाताे. यावर शिंपले नैसर्गिकरीत्या चिकट स्त्राव साेडतात. यासाठी १८ ते २४ महिन्यांचा कालावधी लागताे. या कालावधीत माेती पूर्णत: परिपक्व हाेताे. मिश्रधातूला दिलेल्या आकारानुसार त्याची घडण हाेते. दरम्यान, शिंपल्यांना खाद्य म्हणून महिन्यातून एकदा शेणगाेवऱ्यांचा अर्क दिला जाताे. मात्र, साेडा व विषयुक्त रसायने शिंपल्यांसाठी घातक ठरतात.

४० शेळ्याही दावणीला शेतकरी संजय गंडाटे यांच्याकडे लहान-माेठ्या अशा एकूण ४० शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी छाेटे शेड आहे. शेडमध्ये व अंगणात त्यांची दावण आहे. शेती व माेती संवर्धनाला जाेड म्हणून ते शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. शेळ्यांच्या राखणीची जबाबदारी त्यांचे वडील सांभाळतात.

एका एकरात चंदनाची शेती गंडाटे यांनी पावणेदाेन एकराच्या क्षेत्रात एक एकरवर चंदनाची ७४० झाडे तीन वर्षांपूर्वी लावली. याच जागेवर त्यांनी चिकूचे ८०, लिंबू ३०, डाळिंब ३०, सीताफळ ३० व पपईची २० झाडे लावली. तसेच सभाेवताल निलगिरीची १०० झाडे लावली आहेत. सध्या ही झाडे जाेमात वाढलेली आहेत.

बांबू, सागवान अन् सुबाभुळीने शेत हिरवेगार शेतकरी गंडाटे यांच्या वडिलाेपार्जित व सयुक्तिक मालकीच्या अडीच एकरात सागवानाची २ हजार २०० झाडे आहेत. बांबूचे ४४० राेपटे आता माेठे झुबके बनलेले आहेत. यामुळे ही शेती हिरवीगार दिसून येते.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्र