Join us

Peru Farmer Success Story : तैवान पेरूच्या ८५० झाडांमधून युवा शेतकरी नेताजीने केली पाच लाख उत्पन्नाची शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 10:17 AM

सुलतानगादे (ता. खानापूर) येथील युवा शेतकरी नेताजी बाबासो जाधव यांनी माळरानावर पेरूची लागवड करून यावर्षी पाच लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

संदीप मानेखानापूर : सुलतानगादे (ता. खानापूर) येथील युवा शेतकरी नेताजी बाबासो जाधव यांनी माळरानावर पेरूची लागवड करून यावर्षी पाच लाख रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

दुष्काळ भागात पेरू लागवडीपासून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने शेतकऱ्यांचा ओढा पेरु पिकाकडे वाढू लागला आहे. पदवीधर असलेल्या नेताजी जाधव यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीचा पर्याय निवडला.

अनेक संकटावर मात करत ते शेतीमध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतात. दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावर टेंभूचे पाणी आल्यापासून युवकांचा शेतीकडे ओढा वाढू लागला आहे. या भागात द्राक्ष व उसाचे प्रमाण वाढू लागले आहे.

निसर्गावर मात करून कष्टाने पिकवलेल्या द्राक्षाला वातावरणाचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो. या भागात हक्काचा सहकारी साखर कारखाना नसल्याने ऊस घालवताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येते.

त्यामुळे ऊस व द्राक्षाला पर्याय म्हणून जाधव यांनी दोन एकर क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी तैवान पेरूची लागवड केली. त्यांनी या क्षेत्रामध्ये एकूण ८५० पेरूची झाडे लावली आहेत. झाडांची चांगली वाढ झाल्यावर त्यांनी पहिल्या वर्षी चार टनाचे उत्पन्न घेतले.

यावर्षी त्यांनी आतापर्यंत नऊ टनाचे उत्पन्न घेतले असून त्यांना किलोला ६० ते ७० रुपये असा दर मिळाल्यामुळे पाच लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरू पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्यामुळे घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांचा पेरु पिकाकडे ओढा वाढू लागला आहे. 

आम्ही शेतीमध्ये विविध पिके घेण्याचा प्रयोग केला होता. टोमॅटो व फुल शेतीमधून मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचे उत्पन्न मिळत होते परंतु दर मिळत नसल्याने नुकसान सोसावे लागत होते. मात्र पेरू लागवडीपासून आम्हाला चांगले उत्पन्न मिळाले असून आम्ही अजून दोन एकर क्षेत्रावर पेरूची लागवड करणार आहे. - नेताजी जाधव, शेतकरी, सुलतानगादे

टॅग्स :शेतकरीशेतीफलोत्पादनऊसफळेद्राक्षेखानापूर