Join us

Peru Sheti Success Story : ऊस पट्ट्यात शिवाजीरावांच्या पेरूची हवा; चार वर्षात चार कोटी नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:59 IST

कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला.

प्रताप बडेकर कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील शिवाजीराव माधवराव पाटील या प्रयोगशील शेतकऱ्याने पेरुची यशस्वी शेती करून सहा एकरातून पाच वर्षात तब्बल चार कोटी रुपयांचा नफा मिळवला. ऊसशेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळवले.

शिवाजीराव पाटील यांची कासेगावमध्ये एकाचठिकाणी वडिलोपार्जित ३० एकर शेती आहे. त्यांनी शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली. वाळवा तालुका हा ऊस शेतीचा भाग म्हणून परिचित आहे.

ऊस शेतीमुळे जमिनीचे होणारे नुकसान ओळखून पाटील यांनी ऊस शेतीला पूर्णपणे बगल देऊन २००७ पासून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविले.

यामध्ये केळी, शेवगा, कलिंगड, शेवंती फुले, पेरू आदींची यशस्वी लागवड करून ऊस शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला. शेतीचे एकरी उत्पन्न तर वाढलेच. पण, शेतीचे क्षारपडीपासून बचाव झाला आणि पाण्याची ७० टक्के बचत झाली.

२०१८ मध्ये त्यांनी थायलंड देशातील बी.व्ही. १ या पेरू जातीची सहा एकरांत लागवड केली एकरी सरासरी ५०० रोपे १० बाय ८ अशा पद्धतीने सरी सोडली, पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा, याकरिता दोन्ही बाजूंचे भुंडे मोठे ठेवले.

ठिबक यंत्रणेद्वारे पाणी व खते दिली. सेंद्रिय खताला प्राधान्य दिल्यामुळे उत्पन्न वाढले आणि जमिनीचे आरोग्यही चांगले राहिले. पाहिले दीड वर्ष योग्य प्रकारे काळजी घेतल्यामुळे पेरूची शेती चांगली बहरली, २०२० च्या शेवटी प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली.

चार वर्षात चार कोटी नफा; अरब देशात निर्यात- एका पेरूचे वजन सरासरी ३०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत आहे. उत्पादित केलेला माल अरब देशात निर्यात केला आहे.- त्याचबरोबर कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, मुंबई, कराड आदी भागातील व्यापारी स्वतः शेतात येऊन पेरू खरेदी करीत आहेत.- पेरूला प्रतिकिलो ६० रुपये दर मिळाल्यामुळे एकरी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.- सहा एकरात ४ वर्षांमध्ये खर्च वजा जाता चार कोटी रुपयांचा नफा मिळाला असून त्यांच्या पेरुस मोठी मागणी मिळत आहे.

अधिक वाचा: काय सांगताय? हा शेतकरी आहे २४ ऊस हार्वेस्टिंग मशीनचा मालक; वाचा सविस्तर

टॅग्स :फलोत्पादनफळेशेतकरीशेतीठिबक सिंचनसांगलीपीकऊसखते