रविंद्र शिऊरकर
गोदावरीच्या काठाजवळ वसलेलं शंकरपूर (ता. गंगापूर) हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पारंपरिक ऊस पिकाचा पट्टा असलेलं गाव. मात्र आता या गावातील मिश्र पीक पद्धतीतून ऊस पिकाला फाटा देत कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळविण्यात श्री अभंग शेवाळे यांनी आपला वेगळेपणा निर्माण केला आहे. ज्यातून परिसरातील अनेक शेतकरी शेवाळे यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे.
शेवाळे यांचे पदवीचे शिक्षण झाले असून आणि त्यांनी नोकरीच्या वाटेला न जाता थेट वडीलोपार्जित १२० एकर शेताकडे धाव घेतली. कमीतकमी रासायनिक व अधिकाअधिक जैविक शेती करण्याकडे कळ असल्याने त्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता मिश्र पीक पद्धतीतून पीक घेण्याचे ठरवले.
यातून गेल्या सहा वर्षांपासून पारंपरिक ऊसाच्या शेतात शेवाळे तूर, कापूस, सोयाबीन, मोसंबी, आद्रक, चिकू, आंबा, असे पिके घेत आहे. तसेच ही पिके घेतांना सतत पीक पद्धतीत बदल करण्यापासून ते नवनवीन प्रयोग करतांना ते दिसून येतात हे विशेष.
सहा वर्षांपासून ही सर्व पिके घेतांना त्यांना तूर या पिकाने चांगली साथ दिल्याचे ते सांगतात. चांगले कुजलेले शेणखत, हिरवळीचे खते, तसेच पिकातील आपला वाटा घेत इतर अवशेष जमिनीत एकजीव करत ते मातीचे व्यवस्थापन करतात. ज्यामुळे त्यांना अधिकचे उत्पादन मिळते.
तसेच तूर पिकाचे नियोजन करतांना वनामकृवि परभणीचे बियाणे विक्री केंद्र छत्रपती संभाजीनगर येथून बियाणे खरेदी पासून लागवडीचे अंतर, खत व्यवस्थापन, कीड संरक्षण याबाबत डॉ सूर्यकांत पवार (सहयोगी संचालक संशोधन), डॉ दीपक पाटील (कडधान्य पैदासकार), डॉ एस बी पवार, डॉ डी के पाटील यांचा तांत्रिक सल्ला वेळोवेळी मिळाल्याचे शेवाळे आवर्जून सांगतात.
तूर व्यवस्थापन व लागवड
टोकन पद्धतीने दोन ते तीन दाणे टाकत. दोन ओळीतील अंतर ७ फुट तर दोन झाडांतील अंतर १.५ राखत शेवाळे यांनी यावर्षी वनामकृवी ने विकसित केलेल्या गोदावरी या जातीच्या तुरीची लागवड केली होती. तर खत व्यवस्थापनात एक बॅग डीएपी, फळधारणेच्या वेळी सुष्म अन्नद्रवांची फवारणी व किटकांच्या नियंत्रणासाठी कीटक सापळे तर काही अंशी रासायनिक किटकनाशकांचा वापर केला होता.
ठिबकचा वापर असलेल्या या तुरींची लागवडीनंतर ३५ - ६५ - ८० व्या दिवशी शेंडा खुडणी केली असल्याचे ही ते सांगतात. खुडणी केल्याने फवारणीचा अधिक फायदा होतो कीटकांवर नियंत्रण मिळविता येते. योग्य सूर्यप्रकाश मिळतो. तसेच वेळोवेळी झाडांना माती लावली जाते ज्यामुळे वरंबा तयार होऊन अधिकचा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा होतो व झाडांचे नुकसान टळत असल्याचे शेवाळे सांगतात.
तसेच शेवाळे हे तुरींची काढणी मजुरांद्वारे करतात व झाडांचे उर्वरित अवशेष जमिनीत गाडून देतात.
तूरीच्या उत्पन्नाला मकाचा आधार
साधारण जानेवारी मध्ये तूर काढल्यानंतर त्या शेतात मका लागवड केली जाते. तुरीचे अवशेष जमीनदोस्त केल्याने त्यातून निर्माण झालेला अधिकचा नत्र पोषक ठरत असल्याने यातून मका चांगली बहरते. एकरी ३५ क्विंटल पर्यंत शेवाळे मकाचे उत्पादन घेतात. तर खर्च वजा जाता निव्वळ नफा म्हणून पन्नास हजारांचे तुरीला आधार असलेले उत्पन्न मका पिकातून त्यांना मिळतात.
उत्पन्न आणि खर्च
यंदा मशागत, बियाणे, लागवड, खते, व्यवस्थापन, काढणी आदींसाठी सरासरी एकरी वीस हजारांचा खर्च तुरींवर झाला. तर एकरी १० क्विंटलचे उत्पादन मिळाले. यावर्षी तुरींना अकरा हजारांचा दर मिळाला असून खर्च वजा जाता ऊसा पेक्षा कमी कलावधीत अधिक उत्पन्न ऐंशी हजार मिळाले असल्याचे अभंग शेवाळे सांगतात.
हेही वाचा - भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी