संतोष स्वामी
पोलिस आणि शेतीचा फारसा काही संबंध येत नाही. परंतु, वारकरी कुटुंबात जन्मलेल्या सेवानिवृत्त पोलिस फौजदाराने मुरमाड जमिनीवर दोन एकरात मिरचीचे पीक घेतले. यासाठी जवळपास दोन लाख रुपये खर्च आला. आता मिरचीचे पीक चांगलेच बहरले असून, अंदाजे ११ लाखांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आहे.
आधुनिक शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेता येते, हा आदर्श त्यांनी तरुण शेतकऱ्यांना घालून दिला आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील तपोवन येथील सुभाष संभाजीराव कराड नुकतेच पोलिस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी आपले मन शेतीत रमवले. आधुनिक शेतीतज्ज्ञ वैजनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माळरानावरील दोन एकर शेतीत मिरची लागवड केली.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खतपाणी व कीड नियंत्रण आदी मशागत केली. आता जवळपास तीन फुटांपर्यंत वाढलेले मिरचीचे डेरेदार झाड अक्षरशः फळांनी लगडून गेले आहे. एका झाडाला किमान अडीचशे ग्रॅम मिरची निघेल, असा कराड यांचा दावा आहे. त्यामुळे एकरी दोन ते तीन लाखांचा निव्वळ नफा होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, गुरुवारी मिरचीच्या शेतीची पाहणी व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. पाटलोबा मुंडे, विलास मुंडे, योगेश खेर, नाबार्डचे तात्यासाहेब मरकड, कार्तिक आय्यार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
भावाच्या सल्लाने राजेंद्र करताहेत शेती; लिंबू आंबा मिश्र फळबागेतून उत्पन्नाची हमी
यावेळी सुभाष कराड म्हणाले, पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेली शेती निश्चित फायदेशीर ठरू शकते. लाल मिरचीच्या लागवडीतून एकरी दोन ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कसा कमावता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
...अशी केली मिरची पिकाची लागवड
सुभाष कराड यांनी दि. १० डिसेंबर रोजी जवळपास २० हजार रोपट्यांची मल्चिंगवर लागवड केली. ठिबक सिंचन, मल्चिंग, खत, पाणी, मजुरी व फवारणीसाठी त्यांनी दोन लाख रुपये खर्च आला. अवघ्या चार महिन्यांत मिरचीचे पीक बहरले.
सध्या पाच टन लाल मिरचीतून ११ लाखांचे उत्पन्न कराड यांना अपेक्षित आहे. लवकरच मिरचीची निर्यात बाजारात करण्यात येणार आहे. तसेच तरुण व प्रयोगशील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला कराड यांनी दिला.