Join us

पन्नास गुंठ्यातल्या डाळिंबाला दहा वर्षात एक कोटीचा बहर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2023 12:42 PM

बीड जिल्ह्यातील हरिनारायण आष्टा येथील दत्तात्रय गर्जे यांची यशोगाथा

नितीन कांबळे

कमी पाण्यावर जास्त उत्पन्न आणि नगदी पीक म्हणून फळबाग शेतीकडे पाहिले जाते. याच पिकातून आर्थिक उन्नती साधायची, अशी खुणगाठ मनाशी बांधून कोरडवाहू ५० गुंठे शेतीत भगव्या डाळिंब जातीच्या ५०० झाडांची लागवड करून दहा वर्षांत १ कोटी रुपये उत्पन्न मिळवलेल्या शेतकऱ्याची ही यशोगाथा.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या हरिनारायण आष्टा येथील शेतकरी दत्तात्रय गर्जे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. त्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करून आर्थिक उन्नती साधायचा निर्णय घेण्याचे ठरवले.  रोजगार हमीतून फळबाग योजनेचा त्यांनी लाभ घेतला आणि २०१३ साली जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथून ५००  रोपे आणली. त्याची १३ बाय १० अशा ठिंबक करत झाडांना पाण्याची अंतरावर लागवड केली.  

पाण्याची व्यवस्था म्हणून विहीर बोअर, शेत तलावाच्या माध्यमातून ठिबक सिंचनाचा वापर केला.  हे करत असताना जिल्हा अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शन घेत बागांची जोपासणा करण्यास सुरुवात केली. दहा वर्षात रोपे, मजुरी, फवारणी व बाजारपेठेची वाहतूक असा एकूण २३ लाख रूपये यासाठी खर्च झाला. या दहा वर्षात त्यांना तब्बल १ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. 

पुणे येथील बाजारपेठेत जास्त खर्च वाढत असल्याने त्यांनी जागेवरच विक्री सुरू केली. दरवर्षी साधारण पन्नास गुंठे क्षेत्रातून १९ ते २० टन माल घेतात. आष्टी सारख्या दुष्काळी भाग असताना जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर डाळिंब शेतीने आर्थिक उन्नती साधता आली.

पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे वळून कमी खर्चात जास्त , उत्पन्न मिळणारी फळबाग शेती वरदान ठरणारी असून जास्तीत जास्त सोय शेतकऱ्यांनी फळबाग शेतीकडे वळावे, कृषी असा सल्ला गर्जे यांनी दिला आहे.

टॅग्स :शेतकरीबीडमार्केट यार्ड