लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय खताच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले आहे. या तरुणाच्या यशाची राज्य शासनानेही दखल घेऊन उद्यान पंडित पुरस्कारही त्यांना जाहीर केला आहे.
रुपेश गायकवाड यांच्या वडिलांचा शेती हा एकमेव व्यवसाय होता. आजोबांकडे थोडीफारच शेती होती. वडील बाळासो गायकवाड हे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेती खरेदी केली.
आधुनिक शेती करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी पाण्याचे मोठ्या प्रमाणात असणारी टंचाई आणि फोंड्या माळरानावर असणारी शेती यातून त्यांनी डाळिंब लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.
डाळिंबावर बिब्या रोगासह पाणी टंचाईचे संकट होते. वडिलांनी शेतीकडे हळूहळू दुर्लक्ष करत मुले रुपेश व अमर यांच्याकडे शेतीची जबाबदारी दिली. दोन्ही मुलांनी विशेषतः रुपेश यांनी शेतीकडे विशेष लक्ष देत नवीन तंत्रज्ञान व त्यामध्ये होत असणारे बदल, सेंद्रिय शेतीकडे बारकाईने लक्ष केंद्रित केले. जवळपास आज अखेर पाच हजारांपेक्षा अधिक डाळिंबाची झाडे लावली आहेत.
डाळिंबावर येत असणाऱ्या तेल्या, बिब्या, फळ कुजवा, मर रोग, तेलकट, डांबऱ्या, पिन होल बोर यासारख्या रोगांवर मात करून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पादन रुपेश गायकवाड यांनी घेतले आहे. विशेषतः डाळिंब बाग धरण्यापासून पुढे डाळिंब फळ मार्केटला जाऊपर्यंत रुपेश यांचे उत्तम नियोजन व शेतीबाबत केलेला अभ्यास हेच त्यांच्या यशाचे गमक राहिले आहे.
याच बरोबर त्याने शासन मान्य डाळिंब रोपवाटिका सुरू केली आहे. डाळिंब बागेतील झाडांपासून त्याने रोपे बनवण्यास सुरूवात केली. डाळिंबाच्या माध्यमातून रुपेश याचे कुटुंब समृद्ध तर झालेच पण इतर शेतकऱ्यांना देखील समृद्ध करण्यासाठी रुपेश याने रोपवाटिकेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे.
या रोपवाटिकेत फक्त डाळिंबच नव्हे तर आंबा, नारळ, चिंच, यासह अन्य उत्कृष्ट रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत. शेती ही पाण्यावर अवलंबून असली तरी त्याचे योग्य नियोजन, संगोपन, लागवड, पिकवलेले विकण्यासाठी असणारी यंत्रणा याचा अभ्यास रुपेश यांनी केला आहे.
शेती ही कुटुंबासह इतर घटकाला ही समृद्ध करते, असा रुपेश गायकवाड यांचा दावा आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच उद्यान पंडित पुरस्कार शासनाने त्यांना जाहीर केला आहे.
असे आहे उत्पन्नाचे गणित.. सध्या माझी पाच एकर ३० गुंठ्यातील डाळिंबापासून यावर्षी ४३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हेक्टरी सरासरी २५ ते ३० टन उत्पादन निघते. यावर्षी एकूण उत्पादन ४३ लाख रुपये झाले आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्याने कमी खर्च होत असून आतापर्यंत एकूण नऊ लाख रुपये खर्च आला आहे. अजून १० ते १२ टन डाळिंबाची विक्री होणार आहे. आतापर्यंत सरासरी १२५ रुपये दर मिळाला आहे. - रुपेश गायकवाड, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी
अधिक वाचा: जिगरबाज दोन मित्रांची वाट्याने शेती... शिक्षणाला अनुभवाची जोड अन् यशाला नाही कशाची तोड