बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या आंबेवडगाव येथील तरुण शेतकऱ्याने नियोजनबद्धपणे डाळिंबाची बाग फुलवली आहे. एक एकरात लावलेब्या बागेत पहिल्याच आठवड्यात तब्बल ७ लाखांचे ५ टन उत्पादन झाले आहे. तर दुसरा तोडा अजून बाकी आहे. शिक्षकी पेशा सांभाळून तरुणाने इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
धारुर तालुक्यातील आंबेवडगाव परिसरात डोंगराळ भाग असून कोरडवाहू शेती आहे. मात्र, कुंडलिका धरण, आरणवाडी साठवण तलाव, चारदरी साठवण तलाव व यासह छोट्या-मोठ्या प्रकल्पांमुळे जमीन ओलिताखाली आली आहे. त्यामुळे नगदी पिके व फळशेतीकडे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस कल वाढला आहे.
ऊस, भाजीपाला व फळशेती पिकवण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेती व्यवसाय परवडत नाही, अशी अनेकांची ओरड असते. मात्र, कष्ट केले की, फळदेखील मिळतेच, याची अनेक उदाहरणे सापडतात. आंबेवडगाव येथील पेशाने शिक्षक असलेले नारायण रुद्रे व कुटुंबीयांनी काही वर्षांपूर्वी एक एकरात डाळिंबाची लागवड केली होती.
कसा मिळाला किलोमागे भाव?
डाळिंबाची बाग बहरून आली असून, मोठ्या प्रमाणात फळेही लगडली आहेत. पहिल्या तोडणीला ५ टन माल निघाला. त्याला १०० रुपये किलोप्रमाणे भाव मिळाला. पुन्हा एक तोडणी होणार असून, अडीच टनांपर्यंत माल निघण्याचा अंदाज आहे.
आधुनिक शेती करावी
नारायण रुद्रे शिक्षक असून, ते शेतीही पाहतात. नोकरी करून त्यांनी फळबागेतून भरघोस उत्पादन घेतले आहे. पूर्णवेळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेण्यापेक्षा आधुनिक शेती करावी. त्यामुळे कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन घेतले जाऊ शकते, हे सर्वांना दाखवून दिले.