Join us

Pomegranate Success Story दहावी पास शेतकऱ्याची भगव्या डाळिंबातून कोटींची आर्थिक क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 7:00 PM

पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत, तीन एकर खडकाळ शेतात लागवड केलेल्या भगव्या डाळिंबातून विलास जगताप या तरुण शेतकऱ्याने आर्थिक क्रांती साधली आहे.

नितीन कांबळे

पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत तीन एकर खडकाळ शेतात लागवड केलेल्या भगव्या डाळिंबातूनआष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील विलास जगताप या तरुण शेतकऱ्याने आर्थिक क्रांती केली आहे. सात वर्षांत खर्च लाखांत तर उत्पन्न कोटींच्या घरात गेल्याने फळबागेच्या शेतीत तो रमला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील टाकळसिंग येथील विलास जगताप या दहावी पास तरुण शेतकऱ्याने तीन एकर शेतात भगव्या डाळिंबाची लागवड करण्याचे ठरवले व २०१७ ला अहमदनगर जिल्ह्यातून ११०० रोपे आणून आपल्या खडकाळ शेतात १२ बाय आठ अशा अंतरावर लागवड करत ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाण्याची सोय केली.

यासाठी आजपर्यंत त्यांनी लागवड, पाणी, औषध, फवारणी असा पाच लाख रुपये खर्च केला, डाळिंबाच्या बागेतील फळे सोलापूर, मुंबई, सांगोला, पुणे, राहता तसेच जागेवरच आलेल्या व्यापाऱ्याला विक्री करून एक कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.

'तरुणांनी फळबाग शेतीकडे वळावे'

पारंपरिक शेती न करता तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे. कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन घेत आपल्या ज्ञानाचा उपयोग आधुनिक शेतीसाठी केल्यास नक्कीच फायदा होतो. त्यामुळे फळबाग शेतीकडे तरुणांनी वळावे, असे प्रगतिशील शेतकरी विलास जगताप यांनी सांगितले.

कृषी विभागाकडून फळबागेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात फळबाग क्षेत्र वाढले आहे. - गोरख तरटे, कृषी अधिकारी.

हेही वाचा - आपल्या शैक्षणिक ज्ञानाच्या जोरावर फुलंब्रीच्या संतोषरावांनी आद्रक पिकातून घेतले विक्रमी उत्पन्न

टॅग्स :डाळिंबफळेशेतकरीशेतीपीक व्यवस्थापनआष्टीबीडमराठवाडाशेती क्षेत्रतंत्रज्ञान