Join us

Pomegranate Farming Success Story: शेतातील नवनवीन प्रयोगशीलतेमुळे विष्णुरावांना डाळिंब बागेतून मिळतेय लाखो रुपयांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:16 AM

Pomegranate Farming Success Story: कौडगाव येथील शेतकरी विष्णू वादे यांनी डाळिंब फळबागेतून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे.

फकिरा महम्मद बागवान

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरीपासून जवळ असलेल्या कौडगाव येथील शेतकरी विष्णू वादे यांनी डाळिंब फळबागेतून (Pomegranate Success Story)आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे.

वादे यांनी सुपर भगवा या जातीची डाळिंबाची १४०० झाडे लावली आहेत. अतिशय कमी पाण्यावर त्यांनी ही १४०० डाळिंबाची झाडे जगवली आहे. या बागेपासून आज त्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

विष्णु वादे यांच्याकडे ३५ एकर जमीन आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीकामे करत शेतीपिकांसाठी रासायनिक खताऐवजी ते शेणखतांचा अधिक वापर करतात. ज्यात दरवर्षी ते किमान २० ते २५ गाड्या शेणखत वापरतात.

यासोबत दरवर्षी शेतात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आधुनिक प्रयोगातून ते पपई, काशीफळ, नयना खरबूज (जे दुबईला निर्यात झाले होते) व कांदा आदी पिके त्यांनी घेतात. विविध फळपिकांचे उत्पादन घेतांना पपईमध्ये कांदा हे आंतरपीक घेऊन त्यांनी दोन लाख रुपये उत्पन्न मिळवले होते हेही विशेष.

वादे यांनी जोपासलेली डाळिंबाची बाग आज चांगलीच बहरली आहे. यातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळणार आहे. 

पाण्याचा सुयोग्य वापर करत विशेष व्यवस्थापनावर भर

शेततळ्याचा वापर करून वादे आधुनिक पद्धतीची शेती करत आहेत. वीज नसल्यावर शेततळ्यात सायपनचा उपयोग करून पिकांना पाणी दिले जाते. यासोबतच डाळिंब फळ बागेच्या त्यांनी मागील चार-पाच वर्षांपासून आपल्या अचूक व्यवस्थापनेच्या जोरावर वीज, गारपीट, अवकाळी पाऊस, तेल्या रोग व रोगट वातावरणापासून जपले आहे.

वेळेवर फवारणी आवश्यक

डाळिंब पिकावर सारख्या फवारण्या कराव्या लागतात. त्यासाठी मोठा खर्च होतो. झाडांना फळे लगडल्यानंतर बांधणी करावी लागते. त्यासाठी फळाने लगडलेल्या झाडांना टेकू दिला जातो. यासाठी बांबू, सुतळी आणि मजुरीचाही खर्च मोठ्या प्रमाणात होतो. वेळेवर फवारण्या कराव्या लागतात. हलगर्जीपणा केल्यास डाळिंबाचे पीक हातून जाऊ शकते. आम्ही बागेला जपल्याने आज डाळिंब बागेतून चांगले उत्पन्न मिळाले आहे. - विष्णू वादे, प्रयोगशील शेतकरी, कौडगाव.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :डाळिंबशेतकरीशेतीशेती क्षेत्रजालनामराठवाडाफळे