चंद्रकांत गायकवाडशालेय विद्यार्थ्यांचे डोके सुपीक होण्यासाठी ज्ञानदानाची मशागत करणाऱ्या जवखेडे (ता.पाथर्डी) येथील एका सेवानिवृत्त माध्यमीक शिक्षकाने चिकणी नावाचे बरड जमिनीत ऊसशेती फुलवुन हिरवाईचा साज चढविला आहे. टुमदार घर बांधणे, कारभारणीला घेऊन देवदर्शन सोबतीने पर्यटन करणे, नातवांना दंतकथा ऐकवीत लहान होऊन त्यांच्यातच रममाण होण्याची सेवानिवृत्ती नंतरची सर्वसाधारण रीत पण तिसगाव येथील वृध्येश्वर विद्यालयांतुन सेवानिवृत्त होताच हनुमान नाना चितळे यांनी कारभारणीला सोबत घेत चिकणी मळा बहरवीला.
पंधरा एकर जमीनीचे सपाटीकरण करून बांधबधीस्ती केली.विहीर खोदली,पाईपलाईन करून ठिबक संच बसवुन अकरा एकर क्षेत्रात तीन प्लॉट करून पुर्व पश्चिम पाच फुटी सरी काढुन जुन २०२२ मध्ये २६५ जातीच्या आडसाली ऊसाची दोन डोळे पद्धतीने लागवड केली. सव्वा महीना बाळबांधणी होईपर्यंत दोन खुरपण्या मजुरांकरवी केल्या. तोपर्यंत फ्लो पद्धतीने पाणी दिले आंतरमशागत करतानाच ठिबक संच बसवीला. क्षारयुक्त पाण्याचा त्रास होऊ नये म्हणुन मोठा फिल्टर बसविला. शेजारीच विद्राव्य खते देण्यासाठी पुरक जोडणी केली. विद्राव्य खतांचा एनपीके संतुलीत डोस, डाळींचे पीठ, गुळ, ताक, गोमुत्र, शेण यांचे पंचकाव्य स्लरी मिश्रण देणे यामुळे एक मजुराचे मदतीने देणे सोयीचे ठरले.
पुर्व पश्चिम सरीओरंबा असल्याने हवा खेळती राहिली. चार महिन्यांचे ऊसाचे वय होईपर्यंत घरच्याच छोट्या ट्रॅक्टरने आंतरमशागत केली. असा मेहनतीचा धावता पट साखरबाई व हनुमान चितळे सांगत होते. १४ नोव्हेंबरला तोडणी झाली. प्रतीदीन सात ते आठ तर कधी नऊ टायरगाडी ऊस भरून गेल्या प्रती टायर गाडीचे वजन तीन अडीच ते तीन टन भरत आहे. २० नोव्हेंबर अखेर ४५ टायरगाडी एक एकरांत भरून गेल्यात. एकरी सत्याण्णव टनाची सरासरी लागत असल्याचे कारखाना कर्मचारी आदीनाथ गिरी यांनी सांगीतले.
ठिबक संच असल्याने एक मजुराचे मदतीने फेरपालट करून एकरा एकर ऊसक्षेत्राचे सिंचन केले जाते.सरी काढताना शेणखत वापर,साठ टक्के सेंद्रिय व चाळीस टक्के रासायनीक खतांचा वापर करीत आहोत. - हनुमान चितळे
आधुनिक तंत्रज्ञान वापरून विक्रमी ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांचा वृध्येश्वर कारखाना प्रशासन दरवर्षी सन्मान करते.उद्योग म्हणुन शेतीकडे बघण्याची मानसिकता यांतुन निर्माण व्हावी. हा संचालक मंडळाचा मानस आहे. - राहुल राजळे, संचालक