यादवकुमार शिंदे
रब्बी हंगामात बटाट्याच्या एक एकर शेतीतून अवघ्या ७० दिवसांत कंकराळा येथील शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
शेतकरी शंकर शांताराम लव्हाळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कंकराळा (ता. सोयगाव) शिवारात गट क्र. ७९ मध्ये शेती आहे. त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर त्यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रासायनिक खतांचा वापर न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे ठरविले.
एक एकर क्षेत्रात अगोदर ठिबक सिंचन केले. त्यानंतर त्यात खरीप हंगामात मका, कपाशी आदी पिके घेतली; परंतु रब्बी हंगामात वातावरणात अचानक झालेला बदल पाहून त्यांनी या रबी हंगामात बटाट्याची शेती करण्याचा निर्णय घेतला, यासाठी त्यांनी १० नोव्हेंबर २०२४ रोजी शेतात बटाट्याची लागवड केली.
१ फेब्रुवारीपासून त्यांचे उत्पन्न सुरू झाले आहे. आतापर्यंत त्यांनी २ हजार रुपये क्विंटल प्रमाणे ३० क्विंटल बटाटे शेतीच्या बांधावरच व्यापाऱ्यांना विकले आहे. त्यानंतर फर्दापूर येथील बाजारात २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे २० क्विंटल बटाटे विकले.
असे आतापर्यंत त्यांना १ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून त्यांच्या शेतात आणखी बटाटे आहेत. यामधून त्यांना आणखी ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातून फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभघेऊन आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. - शंकर लव्हाळे, शेतकरी.
सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्यांची लागवड
• शेतकरी शंकर लव्हाळे यांनी त्यांच्या शेतात बटाट्याबरोबरच खरबूज, मेथी, कारले, गिलके, पालक, कोथिंबीर आदी पालेभाज्यांची सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे.
• त्यांच्या शेतातील अनोख्या प्रयोगाची माहिती मिळाल्यानंतर इतर शेतकरी त्यांच्याकडे माहिती घेण्यासाठी येत आहेत.