मुक्त कुक्कुटपालन व्यवस्थापन व विक्री करत काकडणे येथील पदवीधर शेतकरी भूषण महाले आज करताहेत वार्षिक लाखोंची उलाढाल.
कुक्कुटपालनात प्रामुख्याने दोन पद्धतींचा वापर केला जातो. ज्यातील एक व्यवस्थापन पद्धत म्हणजे परसबागेमध्ये केले जाणारे कोंबडी पालन तर दुसरी पद्धत म्हणजे कंपन्यांशी करार करून केले जाणारे कुक्कुटपालन होय. मात्र या दोन्हीही कुक्कुटपालनातील संगोपन पद्धतींना दुजोरा देत जळगाव जिल्ह्यातील काकडणे तालुका चाळीसगाव येथील शेतकरी भूषण शांताराम महाले यांनी आपली नवीन पद्धत आत्मसात करत अल्पावधीत यातून यश मिळवले आहे.
मन्याड धरणामुळे सिंचनाची मुबलक व्यवस्था असल्याने ऊस, कपाशी, कांदा आदी पिकांचा हा पट्टा. मात्र शेती सोबत काहीतरी जोडधंदा असावा या हेतूने पोल्ट्रीची निवड करत भूषण यांनी २०२० मध्ये २४० फूट लांब व ३० फूट रुंद आकाराचे दोन शेड उभारले. परिसरात सुरु असलेल्या पोल्ट्री ला भेट देत माहिती मिळविली व त्यातून एका खाजगी कंपनी सोबत करार करत कुक्कुटपालनास २०२१ मध्ये सुरुवात केली.
मात्र करार पद्धतीत वारंवार विविध अडथळे निर्माण होत होते. ज्यात बऱ्याचदा कोंबड्यांची एक बॅच गेल्या नंतर दुसरी बॅच घेतांना कालावधी अधिक असायचा. तर यासोबत औषधी, खाद्य आदींचा खर्च बघता येणारे उत्पन्न हे अगदीच नगण्य होते. कुक्कुटपालनात होणारी मेहनत, गुंतवणूक आदींचा विचार करता हे उत्पन्न नफ्याचे दिसत नसल्याने भूषण यांनी २०२२ मध्ये करार पद्धतीचे कुक्कुटपालन बंद केले.
पुढे परिसरातील एका खाजगी अंडी उबवणूक केंद्राशी जुळत तर विक्रीसाठी स्थानिक मांस विक्री करण्याऱ्यांशी व परिसरातील हॉटेल सोबत विक्री नियोजन आखत भूषण यांनी २०२२ च्या शेवटीला मुक्त कुक्कुटपालनास सुरुवात केली.
वार्षिक १० ते १५ बॅच
सुसज्य शेड मध्ये छोटे कप्पे करत त्यात दर दहा दिवसांनी एक हजार पक्ष्यांची एक बॅच भूषण सध्या घेताहेत. १ दिवसांचे पक्षी शेड मध्ये आणून तिथून पुढे ५० दिवसांपर्यंत त्यांचे संगोपन केले जाते. पुढे ५ दिवसांत हे पक्षी हातोहात जागेवर विक्री होतात. दोन शेड असल्याने या बॅचचे योग्य नियोजन राखले जात असल्याचे ही ते सांगतात.
वेळेवर लसीकरण व परिपूर्ण खाद्य व्यवस्थापनाने मिळतंय यश
महाले यांच्या शेड वर एक दिवशीय पक्षी आणल्यानंतर तिथून पुढे ५० दिवस संगोपन केले जाते. दरम्यान एक ते सात दिवस पक्षी ब्रुडिंग (आद्रता नियोजित कक्ष) मध्ये ठेवले जातात. पुढे सर्वसामान्य शेड मध्ये ही पक्षी घेतले जातात. जेथे त्यांना अत्याधुनिक खाद्य व पाणी साच्याद्वारे खाद्य व स्वच्छ पाणी दिले जाते. यासोबतच ७ व्या दिवशी लसोटा, १४ व्या दिवशी गंभोरा, २१ व्या दिवशी लसोटा बुस्टर डोस आदी लसीकरण केले जाते.
आता खर्च कमी आणि उत्पन्न झाले अधिक
भूषण सांगतात, बाजारातून खाद्य खरेदी ते पक्षी विक्री आदी बाबी स्वतः करत असल्याने आता खर्च कमी झाले असून उत्पन्नात वाढ झाली आहे. तसेच एका बॅचच्या विक्रीतून सरासरी २५ ते ३० हजारांचा नफा मिळत असल्याचे ही ते सांगतात.