पारंपरिक शेतीतील अडचणींमुळे आणि शिक्षणात आलेल्या अपयशामुळे भिका यांनी अंडी विक्री व्यवसाय सुरू केला. ज्याला पुढे लेयर पोल्ट्रीची जोड दिली, आणि आज ते यातून वार्षिक चांगली आर्थिक प्रगती साधत आहेत.
बारावी परीक्षेचा निकाल लागला, आणि आपण नापास झालो हे माहिती झाल्यावर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. मोठा भाऊ शेती करतो, पण डोंगराळ भाग असल्याने उत्पादन आणि खर्च यांचा ताळमेळ नसल्याने तिकडून आपसूक पाऊले माघारी फिरली आणि जोडधंदा म्हणून अंडी विक्री व्यवसाय उभा राहिला.
नाशिक जिल्ह्यातील अनकवाडे (ता. नांदगाव) येथील राजेंद्र आणि भिका कौतिक जाधव यांना वडीलोपार्जित साडे आठ एकर शेती आहे, ज्याची सर्व धुरा मोठे बंधु राजेंद्र सांभाळतात. २००२ पासून भिका परिसरातील विविध पोल्ट्रीतून अंडी खरेदी करून ती किरकोळ विक्रेत्यांपर्यंत विकतात. दरम्यान, "अंडी बाहेरून खरेदी करून विकणे या पेक्षा आपल्याच पोल्ट्रीत ही अंडी तयार झाली तर?" अशी कल्पना भिका यांना सुचली. मात्र भांडवल अल्प असल्याने शक्य काही होत नव्हतं.
दरम्यान मित्रांसोबत यावर वारंवार चर्चा व्हायची, ज्यातून एका मित्राने "आपण सोबत करूयात" असे सांगितले. दोघांच्या घरचं काही भांडवल आणि काही कर्ज याच्या सहाय्याने २०१३ मध्ये भिका यांनी १६५ बाय ४० फूट शेड उभारून लेयर पोल्ट्रीत पाऊल टाकले. आज यासोबत २०२१ मध्ये बांधले गेलेले आणखी एक ८५ बाय ४० आकाराचे शेड असून दोन्ही मिळून सध्या १२,००० पक्ष्यांची क्षमता भिका यांच्याकडे आहे.
अंडी या मुख्य उद्देशाने होते पक्षांचे संगोपन
परिसरातील खाजगी अंडी उबवणूक केंद्रातून पंधरा आठवड्यांच्या पक्ष्यांची खरेदी केली जाते, आणि त्यानंतर पुढे त्यांचे १५ महिने संगोपन केले जाते. यासाठी एकावर एक जाळीच्या सहाय्याने त्यांना लेयर पद्धतीत ठेवले जाते. दरम्यान, ५०% तयार खाद्य आणि इतर घरच्या शेतात पिकणारा मका भरड खाद्यात दिला जातो, ज्यावर प्रती पक्षी ३०० - ३४० अंडी देतात. यासाठी वेळोवेळी पाण्यातून लसीकरण, प्रतिजैविके देखील दिली जातात.
तेजी-मंदीवर अवलंबून असलेले उत्पन्न
अंडी बाजार दैनंदिन कमी-अधिक होत असल्याने अंडी उद्देशाने सुरू झालेल्या पोल्ट्री व्यवसायाचे उत्पन्न ही तीव्रतेवर अवलंबून आहे. तसेच मजूरी, खाद्य, औषधोपचार असा सर्व खर्च वजा जाता यातून वार्षिक ७-८ लाख मिळत असल्याचे भिका सांगतात. यात अंडी विक्री आणि कोंबडी खत विक्रीचा एकूण नफा समाविष्ट आहे. कोंबडी खताला मागणी असल्याने त्याची जागेवर देखील सुरळीत विक्री होते, ज्यात ६० किलो गोणी - ३०० रुपये आणि २ चाकी ट्रॅक्टर ट्रॉली १३ ते १४ हजारांपर्यंत विक्री होते.
हार मानली नाही म्हणून आज इथं पर्यंत पोहचलो
कोरोना काळात अंडी व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला होता. त्या काळात परिसरातील अनेकांनी आपापले पोल्ट्री बंद केले. मात्र, "यातून मार्ग निघेल" या आशेपोटी मी तग धरून राहिलो, परिस्थितीशी झुंज दिली, त्याचेच फळ म्हणावे लागेल. आज माझा पोल्ट्री व्यवसाय यशस्वीरित्या सुरू आहे. - भिका कौतिक जाधव.