उज्वल भालेकरअमरावती येथील मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहायक कृषी अधिकारी पदाची जबाबदारी प्रतिभा विरुळकर या महिलेने स्वीकारली आहे. तिच्या मार्गदर्शनामध्ये कारागृहातील बंदी बांधवांनी येथील शेती फुलवून कारागृहाला रोज लागणारा ३०० किलोंचा भाजीपाला पुरवठा सुरू केला आहे. उर्वरित भाजीपाला हा इतर जिल्ह्यांतील कारागृहांना तसेच बाजारपेठेत विकून प्रशासनाला दहा महिन्यांमध्ये १८ लाख रुपयांचे उत्पन्नदेखील मिळवून दिले आहे.
अमरावती मध्यवर्ती कारागृहाची स्थापना ही १८६६ मध्ये झाली. या कारागृहाचा एकूण परिसर हा शंभर एकरच्या जवळपास असून, येथील ११ एकर परिसरामध्ये शेती केली जाते. आतापर्यंत याठिकाणी असलेल्या कृषी सहायक पदावर पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती. मात्र, कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून २०२३ मध्ये येथे कृषी सहायक पदाची जबाबदारी एका महिलेने स्वीकारली.
कारागृहातील शेतीत कामगार म्हणून येथील बंदी बांधव काम करीत असल्याने प्रतिभा विरूळकर यांना अनेकांनी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा सल्ला दिला. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनीदेखील त्यांना हे पद न स्वीकारता
मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी ऑक्टोबर २०२३ पासून कार्यरत आहे. कारागृहाची एकूण १०० एकर जमीन आहे. यामध्ये ११ एकर जागेत शेती होत असून, यातून कारागृहाला रोज लागणाऱ्या ३०० किलो भाजीपाल्याचा पुरवठा होत आहे. उर्वरित भाजीपाल्याची विक्री करून १८ लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्नदेखील मिळाले आहे.- केतकी चिंतामणी, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, अमरावती
इतर ठिकाणी बदली मागण्याचा सल्ला दिला होता. परंतु, आपल्या पतीचा आजार आणि मुलीच्या शिक्षणाच्या गहन प्रश्नामुळे अमरावती मुख्यालयी राहणे गरजेचे असल्याने प्रतिभा यांनी कारागृहातील जबाबदारी स्वीकारली. त्यांनी शेतात काम करणाऱ्या ३५ ते ४० कैद्यांना येथील जमिनीचे माती परीक्षण करून तसेच हंगामानुसार कोणते पीक घेणे सोयीचे होईल, याबद्दल मार्गदर्शन करत याठिकाणी वांगे, टोमॅटो, मेथी, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, मिरची, लवकी, कोहळा तसेच लिंबू ही सर्व भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कारागृहाला रोज लागणाऱ्या ३०० किलो भाजीचा प्रश्न कायमचा मिटला. तसेच उर्वरित भाजीपाल्याचा इतर कारागृहाला पुरवठादेखील होत आहे. शेतीच्या कामकाजात कारागृह अधिकारी संगीता शेळके यांच्यासह दोन कारागृह पोलिस कर्मचारी मदत करतात.