नावावर ना गुंठाभर शेती ना फाइलला शिक्षणाची कागदपत्रे. असे असतानाही लहानपणापासून व्यवसाय करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडीतील तरुणाने भाड्याने दहा गुंठे जागा घेत त्यामध्ये पत्र्याचे शेड ठोकून गावरान कोंबडीपालनाचा व्यवसाय सुरू करून बेरोजगारीवर मात केली आहे.
या व्यवसायातून ते वर्षाकाठी साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवून आर्थिक उन्नती साधत आहेत. तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील नवनाथ वळसे यांचे शिक्षण केवळ सातवीपर्यंत झाले. त्यातच नावावर गुंठाभरही जमीन नाही. असे असतानाही त्यांनी व्यवसायाची जिद्द काही सोडली नाही. जवळपास चार वर्षांपूर्वी त्यांनी गवळेवाडी शिवारात माळरानावर १० गुंठे जमीन भाडेतत्त्वावर घेऊन त्यात पत्र्याचे शेड मारले. यात त्यांनी गावरान कोंबडीची पिले संगोपनाचा व्यवसाय सुरू केला. या ठिकाणी ते गावरान अंडी उबवून त्यातून पिल्लांची निर्मिती करतात.
ड्रॅगन कोंबडी लाखांत एक! या कोंबडीत असं काय विशेष आहे?
अंडी उबविण्यासाठी आपण आधुनिक इलेक्ट्रिक मशीन खरेदी केली आहे. त्या मशीनमध्ये एकाच वेळी ४०० गावरान अंड्यांची उबवणूक होते. ही अंडी २१ दिवस मशीनमध्ये ठेवल्यानंतर अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. ही पिल्ले मोठी झाल्यावर गावरान कोंबडीला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. शिवाय, भावही योग्य मिळत आहे.- नवनाथ वळसे, गवळेवाडी
या वर्षी देशातील पोल्ट्री उद्योग ८ ते १० टक्क्यांनी वाढणार
कशी केली गुंतवणूक?या उद्योगासाठी इलेक्ट्रिक मशीनसह एकूण दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. अंड्यातून जन्मलेल्या पिल्लाचे संगोपन करून ते मोठे झाल्यानंतर ही गावरान कोंबडी साधारण ४५० तर कोंबडा ६०० रुपये दराने विकला जातो. या व्यवसायातून वर्षाकाठी ७ लाख रुपयांच्या आसपास त्यांची आर्थिक उलाढाल होते व यातून वर्षाकाठी साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांच्या पदरात पडतो. अगदी कमी गुंतवणुकीत चांगला नफा पदरात पडत असल्याने वळसे यांनी आर्थिक उन्नती साधली आहे. नोकरी नसल्याने हा व्यवसायच आता त्यांचा आधार बनला आहे.