Lokmat Agro >लै भारी > गावरान कुक्कुटपालनातून वयाच्या २३ व्या वर्षी कोट्यावधींची कमाई

गावरान कुक्कुटपालनातून वयाच्या २३ व्या वर्षी कोट्यावधींची कमाई

pune chandkhed 23 year old saurabh tapkir natures best poultry farm Earning crores Gavran Poultry Farming | गावरान कुक्कुटपालनातून वयाच्या २३ व्या वर्षी कोट्यावधींची कमाई

गावरान कुक्कुटपालनातून वयाच्या २३ व्या वर्षी कोट्यावधींची कमाई

'नेचर्स बेस्ट' नावाच्या कंपनीमार्फत अंडी, चिकन आणि शेतकऱ्यांसाठी चिकनची विक्री केली जाते.

'नेचर्स बेस्ट' नावाच्या कंपनीमार्फत अंडी, चिकन आणि शेतकऱ्यांसाठी चिकनची विक्री केली जाते.

शेअर :

Join us
Join usNext

दत्ता लवांडे

पुणे : पुण्यापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदखेड गावात सौरभ तापकीर या अवघ्या २३ वर्षाच्या युवकाने प्युअर गावरान कोंबडी पालनाचा यशस्वी व्यवसाय केलाय. या व्यवसायाच्या माध्यमातून सौरभ महिन्याकाठी तब्बल पाच ते सहा कोटी रूपयांची उलाढाल करतो. त्याच्यासोबत राज्यभरातील ३ हजार शेतकरी जोडले गेले असून या शेतकऱ्यांची अंडीसुद्धा विकत घेऊन त्याची पुणे आणि मुंबईत विक्री करतो. 'नेचर्स बेस्ट' नावाच्या कंपनीमार्फत अंडी, चिकन आणि शेतकऱ्यांसाठी चिकनची विक्री केली जाते.

पुण्यातील हिंजवडी येथील मूळ रहिवाशी असलेल्या सौरभची वयाच्या २३ व्या वर्षातील व्यवसायातील गरूडझेप पाहून अनेक शेतकरी त्याच्या फार्मवर भेटी देत असतात. तर तो प्रत्येक रविवारी शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांकडून अंडी, पिल्ले आणि चिकन विकत घेऊन विक्री करत असल्यामुळे  जवळपास ५ हजार मजूरांना रोजगार मिळाला आहे. एवढ्या कमी वयातील त्याचा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊया.

कशी केली सुरूवात?

सौरभचे वडील वडापाव विक्रीचा व्यवसाय करायचे. तर सौरभही त्यांना कामात मदत करत असायचा. साधारण २०१६ साली सौरभला शाळेत कब्बडी खेळण्याची आवड होती. त्यामुळे त्याला निश्चितच आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अंडी, चिकनचा सामावेश आहारात करावा लागला. पण दररोज गावरान अंडी कुठून आणून द्यायची? कारण पुण्यातील हिंजवडी परिसरात गावरान कोंबड्या पाळणारे शेतकरी जास्त नव्हते. म्हणून सौरभच्या वडिलांनी सौरभला घरी कोंबड्या आणून दिल्या आणि त्या पाळायला सुरूवात केली. 

या कोंबड्यापासून अंडी खायला मिळत होतीच  पण यातून पिल्लेही तयार होत होती. त्यामुळे सौरभने पिल्ले वाढवण्यास सुरूवात केली आणि बघता बघता चारशे ते पाचशे कोंबड्या त्याच्याकडे तयार झाल्या. कोंबड्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे परिसरातील लोकं त्याच्याकडे गावरान अंड्याची मागणी करू लागले. त्याचबरोबर जिवंत कोंबड्याची सुद्धा मागणी होत होती. त्यानंतर गावरान कोंबड्याला चांगली मागणी असल्याचं त्याच्या लक्षात आलं.

अशी होते अंड्याची पॅकिंग
अशी होते अंड्याची पॅकिंग

व्यवसाय कसा झाला मोठा?
गावरान अंड्याची आणि चिकनची मागणी करणारे बहुतांश ग्राहक शहरातील असायचे. माल संपला तरी मागणी वाढतच होती. ग्राहकांच्या मागणीसाठी सौरभने हा व्यवसाय वाढायचं ठरवलं आणि भेटी द्यायला येणाऱ्या शेतकऱ्यांना हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना दिली. पुढे तो शेतकऱ्यांना पिल्लेही पुरवू लागला आणि त्यांच्याकडे तयार झालेला माल विकत घेऊ लागला. काही शेतकरी अंडी तर काही शेतकरी जिवंत कोंबड्या विक्रीसाठी देत होते. हा माल सौरभ पुणे आणि मुंबईमधील सोसायट्यांमध्ये विकायचा. यासाठी त्याला सेंद्रीय शेतकऱ्यांच्या अभिनव फार्मर्स क्लबची मोठी मदत झाली. अभिनव फार्मर्स क्लबकडून भाजीपाला ज्या सोसायट्यांमध्ये पोहोचवला जात होता. त्याच सोसायट्यांमध्ये सौरभ अंडी आणि चिकन विक्री करू लागला.

असा झाला ब्रँड तयार
अंडी घरपोहच देत असताना विक्रीमध्ये अनेक अडचणी आल्या. अंड्याला पॅकिंग नसल्यामुळे अंडे कधीचे आहेत? खराब आहे का? कधी खराब होईल? हे खरोखर गावरान अंडे आहे का? असे प्रश्न ग्राहक विचारू लागले. त्यानंतर आपल्या अंड्याला व्यवस्थित पॅकिंग असावी असं वाटलं अन् सौरभने 'नेचर्स बेस्ट' नावाची कंपनी स्थापन केली. याच नावाने पॅकिंग सुरू करून त्यावर खरे गावरान अंडे कसे ओळखायचे? पॅकिंगची तारीख, खराब होण्याची तारीख याची माहिती देण्यात आली. 'नेचर्स बेस्ट'च्या एका बॉक्समध्ये १२ अंडी असतात. हा बॉक्स २४० रूपये प्रमाणे थेट ग्राहकांना विक्री केला जातो. पुढे 'नेचर्स बेस्ट' नावाचा मोठा ब्रँड तयार झाला. 

नेचर्स बेस्ट च्या माध्यमातून सौरभ आता प्रत्येक रविवारी शेतकऱ्यांना गावरान कुक्कुटपालनाचे सशुल्क प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अंडी विक्रीची अडचण आहे अशा शेतकऱ्यांचा माल त्यांच्या शेतावर जाऊन विकत घेतो आणि 'नेचर्स बेस्ट'च्या माध्यमातून विक्री करतो. 'नेचर्स बेस्ट'सोबत आता राज्यभरातील जवळपास ३ हजार शेतकरी जोडले आहेत. 

सौरभ तापकीर
सौरभ तापकीर

शेतकऱ्यांना असा होतो फायदा
जे शेतकरी येथे भेट देऊन जातात अशा शेतकऱ्यांना सौरभकडून व्यवस्थित मार्गदर्शन मिळते. तर गरज पडल्यास पिल्लेही पुरवले जातात. बहुतांश शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेची अडचण असल्यामुळे नेचर्स बेस्ट कडून थेट शेतकऱ्यांच्या शेतातून अंडी आणि चिकन खरेदी केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्री व्यवस्थेवर खर्च करण्याची गरज नसते. त्याचबरोबर गावरान कोंबडीसाठी जास्त खर्चाची गरज नसल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो.

अर्थार्जन
नेचर्स बेस्ट कंपनीकडून सध्या मुंबई आणि पुण्यात साधारण रोजचे ८० हजार ते १ लाख ३० हजार गावरान अंड्यांची विक्री होते. पॅकिंग केलेले एक अंडे २० रूपये नगाप्रमाणे विक्री केले जाते. त्याचबरोबर जिवंत कोंबडीसुद्धा मागणीनुसार कमीजास्त दरामध्ये विक्री केली जाते. कमीत कमी ६०० रूपये प्रतिकिलो तर जास्तीत जास्त १ हजार २०० रूपये प्रतिकिलो प्रमाणे जिवंत कोंबडीची विक्री होते. दरम्यान, शेतकऱ्यांना पिल्ले पुरवणे आणि प्रशिक्षणातून मिळालेले उत्पन्न असे मिळून एका महिन्यात 'नेचर्स बेस्ट'ची ५ ते ६ कोटी रूपयांची उलाढाल होते.

सौरभने व्यवसायाच्या माध्यमातून खरेदी केलेली अलिशान कार
सौरभने व्यवसायाच्या माध्यमातून खरेदी केलेली अलिशान कार

सौरभ अवघ्या २३ वर्षाचा आहे.  त्याने वयाच्या १७ व्या वर्षी सुरू केलेल्या छोट्याशा व्यवसायाने गरूडझेप घेतलीये. सध्या त्याचे स्व:ताचे गावरान कुक्कुटपालनाचे २४ शेड आहेत. त्यातून त्याने शेती, अलिशान कार खरेदी केली असून करोडपती उद्योजक होण्याचा पल्ला गाठला आहे.  महिन्याकाठी ५ ते ६ कोटींची उलाढाल करणारी 'नेचर्स बेस्ट' ही कंपनी माझ्यासोबत काम करणाऱ्या ३ हजार शेतकऱ्यांची असल्याचं तो सांगतो. हेच त्याच्या यशाचं गमक आहे. त्याची व्यवसायातील गगनभरारी मोठ्या उद्योगपतीलाही लाजवेल अशी आहे. त्याचा प्रवास नक्कीच शेतकऱ्यांना प्रेरणा आणि उर्जा देत राहील.


हा सर्वांत कमी खर्चात उभा केला जाणारा व्यवसाय असून यामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळतो. तर ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल ते शेतकरी थेट आम्हाला माल विक शकतात. ही कंपनी माझी एकट्याची नाही. माझ्यासोबत जोडलेल्या शेतकऱ्यांची ही कंपनी असून त्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो आहे. एकमेकांना सहकार्य करून पुढे गेलं तरच शेतकरी मोठा होत असतो. माझ्यामुळे अनेक कामगारांना रोजगार मिळाला याचा मला आनंद आहे.
- सौरभ तापकीर (युवा उद्योजक)

Web Title: pune chandkhed 23 year old saurabh tapkir natures best poultry farm Earning crores Gavran Poultry Farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.