Join us

Farmer Success Story : पुण्यातील शेतकऱ्याने केले डाळिंबाच्या बागेत कलिंगडाचे आंतरपीक! एकरी २० टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:35 IST

उत्पादित मालाला बाजारपेठेत सध्या सात ते दहा रुपयांपर्यंत दर मिळत असून कष्टाचे चीज होऊन चांगले पैसे मिळाले असल्याचे शेतकरी नवनाथ देवकर यांनी सांगितले आहे.

Pune : शेती पारंपारीकच असली तरी उत्तम नियोजन, वैयक्तीक कष्ट, हवामानाचा अचूक अंदाज व बाजारपेठेच्या अनुभवाच्या जोरावर शेतीला आधुनीकतेची जोड देऊन देवकरवाडी (ता.दौंड) येथील युवा शेतकरी नवनाथ देवकर यांनी जिद्द, चिकाटी, प्रामाणिक कष्टाच्या जोरावर योग्य व्यवस्थापन करत डाळिंबाच्या बागेत कलिंगड पिकाचे आंतरपीक घेऊन एकरी वीस टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.

सुरुवातीला शेतीची मशागत करताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने दोन वेळा उभी आडवी नांगरट तसेच काकरणी, रोटावेटर करण्यात आली. त्यानंतर कंपोस्ट शेणखत मिश्रण काकरणी करुन आठ बाय बारा फूट रुंदीचा पट्टा काढण्यात आला. मुख्य पट्ट्यावर लागवडी योग्य जमीन तयार करून डाळिंबाची लागवड करण्यात आली.

डाळिंबाची झाडे जोमात आल्यानंतर पट्ट्यातील मधल्या अंतरामध्ये नवीन बेड तयार करुन मल्चिंग पेपरच्या साह्याने कलिंगडाच्या रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन प्रणालीद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली असून वॉटर सोल्यूबल खतांचा वापर तसेच वेळोवेळी पाण्यातून खतांची मात्रा दिल्यामुळे वेलांची उत्तम वाढ होऊन फळधारणा चांगली झाली आहे. 

ठिबकद्वारे पाणी पद्धतीचा वापर केला असल्यामुळे तणांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले. परिणामी कुठलेही रासायनिक औषधे न फवारता घरगुती खुरपणीवर भर देऊन तणव्यवस्थापन करण्यात आले. साधारणपणे साठ ते पासष्ट दिवसात फळांची साईज पाच ते सात किलोपर्यंत मिळत असून एकरात अठरा ते वीस टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे. 

उत्पादित मालाला बाजारपेठेत सध्या सात ते दहा रुपयांपर्यंत दर मिळत असून कष्टाचे चीज होऊन चांगले पैसे मिळाले असल्याचे शेतकरी नवनाथ देवकर यांनी सांगितले आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणे