Join us

Ramesh Kharmale : ३०० तास, ७० जलशोषक चर, ४५० झाडांचे वृक्षारोपण करणारा 'पर्यावरणरक्षक' कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 10:35 PM

Ramesh Kharmale : "...यामुळे एका पावसात ८ लाख लीटर पाणी जमिनीत मुरते"; खरमाळे यांच्या प्रयत्नाने कशी टिकली डोंगरावरील जैवविविधता?

जुन्नर येथील माजी सैनिक आणि सध्याचे वनविभागात वनरक्षक म्हणून रूजू असलेले रमेश खरमाळे मागच्या अनेक वर्षांपासून जलसंवर्धनाचं आणि वृक्षारोपणाचं काम करतायेत. २०२१ साली त्यांनी दोन महिन्यात ४१२ मीटर लांबीच्या ७० जलशोषक चरांची निर्मिती केली. यामुळे पावसाळ्यात करोडो लीटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत झालीये. त्यांच्या या कार्याचे अनेक स्तरातून कौतुक होत असून अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय.

जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रमेश खरमाळे हे लष्करात नोकरी केल्यानंतर २०१२ साली निवृत्त झाले. त्यानंतर दोन वर्षे बँकेत नोकरी केली पण तिथे त्यांचे मन रमले नाही. पुढे जुन्नरला अॅकॅडमी सुरू केली. या माध्यमातून अनेक मुले लष्करात भरती झाले. पण तिथेही मन न रमल्याने त्यांनी वन विभागाची परीक्षा देऊन वनरक्षक पदावर काम करण्यास सुरूवात केली. 

आपण निसर्गाकडून कायम घेत आलोय. पण आपल्याकडे निसर्गाला देण्यासाठी काहीच नाही. आपण निसर्गाचे काहीतरी देणे लागतो या निस्वार्थी भावनेने त्यांनी पर्यावरणासाठी, निसर्गासाठी काम करण्यास सुरूवात केली. २०२१ साली रमेश यांनी स्वतःच्या वाढदिवशी पर्यावरणाला एक भेट देण्याचं ठरवलं आणि जुन्नर शहराजवळ असलेल्या धामणखेल डोंगरावर जलशोषक चर खोदण्यास सुरूवात केली.

पुढील साधारण २ महिन्यांमध्ये रमेश आणि त्यांच्या पत्नीने ३०० तास काम करून ७० जलशोषक चरांची निर्मिती केली. या चरांची लांबी ही ४१२ मीटर एवढी होती. विशेष म्हणजे या जलशोषक चरांच्या माध्यमातून एकाच पावसातून ८ लाख लीटर वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली. पुढे याच डोंगरावर जवळपास साडेचारशे झाडांची लागवड त्यांनी केली.

रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे चरांमधील माती काढताना

ऑक्सिजन पार्कची निर्मितीजुन्नर शहरापासून जवळ असलेल्या वडज येथे लोकसहभागातून त्यांनी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या झाडांची लागवड केली असून येणाऱ्या काळात झांडाची वाढ झाल्यानंतर येथे जैवविविधता पाहायला मिळणार आहे.

पर्यावरण रक्षणडोंगरावरील जैवविविधता टिकावी यासाठी त्यांनी वणवे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. लागवड केलेल्या झाडांना उन्हाळ्यात डोंगरावर पाणी नेऊन जगवले आहे. त्याचबरोबर जंगलातील जखमी प्राणी, पक्ष्यांना जीवदान देण्याचं काम त्यांनी केलंय.

लोकसहभागलोकसहभागातून जलसंवर्धनाचे आणि वृक्षारोपणाचे काम करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ऑक्सिजन पार्कसाठी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून झाडे देण्याचे आवाहन केले आणि काही वेळातच लोकांनी त्यांना १०० पेक्षा जास्त झाडे दिली. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी अनेकदा शाळकरी मुलांची मदत झाल्याचंही ते सांगतात. 

निस्वार्थी भावनेने कुटुंबाची साथरमेश हे केवळ एकटेच नाही तर त्यांची पत्नी स्वाती आणि शाळेत जाणारे दोन्ही मुले त्यांना जलसंवर्धनाच्या कामात मदत करतात. सुट्टीच्या दिवशी निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याच्या दृष्टीकोनातून आणि या कामात पालकांना मदत म्हणून तेही आनंदाने या कामात सहभागी होत असल्याचं रमेश सांगतात. 

खरमाळे यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.

कार्याचा गौरवत्यांच्या जलसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, समाजसेवा या कार्याचा गौरव आत्तापर्यंत अनेकदा झाला आहे. त्यांना अनेक संस्था, महाराष्ट्र शासन, वन विभागाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

रमेश खरमाळे मागच्या अनेक वर्षांपासून सह्याद्रीचं अनोखं रूप सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा निःस्वार्थपणे प्रयत्न करतायेत. पर्यावरणासाठी झटणारे, जलसंवर्धन करणारे असे अनेक रमेश खरमाळे समाजात तयार व्हायला पाहिजेत. त्यांच्या कार्याला सलाम...!

टॅग्स :शेती क्षेत्रपुणेजंगल