पुणे : आज पुण्यातील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनी (यशदा) येथे लोकत माध्यम आणि बीकेटी टायर्स आयोजित 'लोकमत सरपंच अवॉर्ड'चे वितरण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्यातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सरपंचांना पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये देशातील पहिले सौरउर्जेवर चालणारे गाव म्हणून बहुमान मिळवणारे मावळ तालुक्यातील पुसाणे गावचे सरपंच संदीप आवढे यांना वीजव्यवस्थापन या प्रकारामध्ये लोकमत सरपंच अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे.
दरम्यान, सरपंच आवढे यांनी एमटीयु या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मदतीने गावामध्ये ४० किलोवॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी करुन पहिल्या टप्प्यात गावातील नळपाणीपुरवठा, गावातील शाळा, मंदीरे, समाजमंदिर, व गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी सौरउर्जेचा वापर सुरु केला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे पुसाणे ग्रामपंचायतीला देशातील पहिले सौरउर्जेवर चालणारे गाव म्हणून बहुमान मिळाला आहे.
सदर सौरउर्जा प्रकल्पाला बॅटरी बॅकअप देखील देण्यात आला असल्याने पावसाळ्यात देखील गावाला विजेची समस्या भेडसावत नाही व विज जाण्याच्या समस्येमुळे डोक्यावर पाणी आणण्याचा महिलांचा त्रास शंभर टक्के बंद झाला आहे. तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी २४ तास वीज उपलब्ध झाली आहे. त्यांनी ग्रामपंचायतसाठी केलेले कार्य हे उल्लेखनीय असून महाराष्ट्रभरातील इतर सरपंचासाठी ते आदर्श ठरले आहेत.
या पुरस्कारांचे वितरण आज झाले असून एकूण १३ सरपंचांना लोकमत सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, वनराईचे रविंद्र धारिया, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते भीम रासकर हे उपस्थित होते.