Lokmat Agro >लै भारी > IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

pune vishal sardeshpande and madhavi deshpande IIT professor researcher at NCL highly educated couple who run Gurhalgharjaggery factory | IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

हे राज्यातील पहिले महिला संचलित तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळघर असून येथे बहुतांश महिला काम करतात.

हे राज्यातील पहिले महिला संचलित तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळघर असून येथे बहुतांश महिला काम करतात.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : एखाद्या उच्चपदस्थ आणि उच्चशिक्षित व्यक्तीने गुऱ्हाळासारख्या उद्योगात पडणं तसं तुरळक वेळा ऐकलं असेल. पण आयआयटीमध्ये गुळावर काम, सखोल संशोधनासाठी परदेशातील ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन अन् पुन्हा मायदेशात परत येऊन पुण्यासारख्या ठिकाणी आपलं गुऱ्हाळघर सुरू करण्याचं काम एका दाम्पत्याने केलंय. विशेष म्हणजे हे गुऱ्हाळघर पूर्णपणे महिलांकडून संचलित करण्यात येतंय. आयआयटी मुंबई सारख्या संस्थेमध्ये पीएचडी करून आयआयटीमध्येच प्राध्यापक असलेल्या आणि नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधक असलेल्या डॉ. विशाल सरदेशपांडे आणि डॉ. माधवी सरदेशपांडे यांची ही कहाणी...

डॉ. विशाल सरदेशपांडे हे मूळचे मराठवाड्यातील परभणीचे. त्यांच्याकडे शेती आणि गूऱ्हाळघर असल्यामुळे त्यांना गुऱ्हाळघर कसं चालतं त्याबद्दल माहिती होती. पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या गुऱ्हाळघराचा त्यांनी अभ्यास केलाच होता पण या लोकल प्रोडक्टला ग्लोबल स्वरूप देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी भारतातील ग्रामीण भागात असलेल्या गुऱ्हाळघरांची रचना आणि अर्थकारणावर अभ्यास करायला सुरूवात केली.  

साधारण १९९७-९८ साली विशाल सरदेशपांडे हे आयआयटीमध्ये शिक्षणासाठी गेले. तेव्हा त्यांचा पुन्हा गुळाशी संबंध आला आणि त्यांनी पारंपारिक गुऱ्हाळामध्ये उर्जा कशी कमी करता येईल आणि कमीत कमी बगॅसमध्ये गूळ कसा तयार करता येईल याचा अभ्यास केला. पुढे पश्चिम महाराष्ट्र आणि राज्यातील विविध भागात दौरे करत असताना गुऱ्हाळघर चालवणाऱ्या व्यवसायिकांच्या मूळ समस्या त्यांच्या लक्षात आल्या. 

त्यामध्ये त्यांनी विना गुळव्याचा, शास्त्रसुद्धा पद्धतीने आणि स्वच्छता ठेवून गूळ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाचे त्यांना पेटंट मिळाले आणि तिथून त्यांचा व्यवसाय उभा राहण्यास मदत झाली. पुढे २०१६-१७ साली विशाल यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात गूळ या विषयावर संशोधन करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. तिथून परत आल्यानंतर त्यांनी स्वतःचा एक प्लँट उभा करण्याचा संकल्प केला आणि पुण्यातील लोणी काळभोर परिसरात २०१७ च्या सप्टेंबर महिन्यात गुऱ्हाळघर बांधण्यास सुरूवात केली. २०१८ साली गुऱ्हाळघर पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुळव्यांकडून गूळ बनवून घेतला पण गुळवे हे केमिकल वापरून गूळ बनवत होते. म्हणून पुन्हा केमिकल विरहीत गूळ कसा तयार करता येईल यावर त्यांचे काम सुरू झाले.

... अन् स्वित्झर्लंडच्या झुरीक विमानतळावर मिळाले सूत्र
केमिकलचा वापर न करता गूळ बनवण्याचे तंत्र त्यांना लवकर सापडले नव्हते. दरम्यानच्या काळात विशाल सरदेशपांडे यांना स्विडन देशात कंसल्टन्सीच्या कामाची ऑफर आली आणि ते स्विडनला गेले. जात असताना झुरीक विमानतळावर त्यांची कनेक्टिंग फ्लाईट मिस झाली आणि ते दिवसभर शांततेत विचार करत असताना विना केमिकलचा गूळ बनवण्यासाठी कोणती प्रक्रिया केली पाहिजे याचे सूत्र त्यांना सापडले. स्विडनला जाऊन परत आल्यानंतर त्यांच्या सुत्रानुसार गूळ बनवायला सुरूवात केली. पुढे त्यांना अपेक्षित असलेल्या केमिकल मुक्त गुळाची निर्मिती त्यांनी त्यांच्या गुऱ्हाळघरात केली आणि खऱ्या अर्थाने इथून व्यवसायाला सुरूवात झाली.

गूळ कारखान्यात बनवली जाणारी गूळ पावडर
गूळ कारखान्यात बनवली जाणारी गूळ पावडर

कोरोनानंतर सुरू केला स्वतःचा नवा प्लँट
पुढे त्यांनी गुऱ्हाळघरात वापरल्या जाणाऱ्या कढायांचा आकार बदलला, त्यातून चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळू लागले. त्यातून त्यांनी गूळाची पावडरही बनवायला सुरूवात केली. केमिकलविरहित गूळ बनवण्याचा सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा फॉर्म्युला त्यांना सापडला आणि डिसेंबर २०१९ साली त्यांनी त्यांच्या व्यवसायातील, त्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाचा पहिला प्लँट विक्री केला.

पण कोरोनामध्ये त्यांच्या गुळाच्या कामाला ब्रेक लागला. पुढे सरदेशपांडे दाम्पत्यांनी पुण्यातील लवळे परिसरामध्ये सुसज्ज आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेला प्लँट उभारला आणि स्वतःच्या तंत्रज्ञानाने बनवलेला केमिकल विरहीत गूळ बनवायला सुरूवात केली.  

डॉ. माधवी देशपांडे आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला
डॉ. माधवी देशपांडे आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला

महिला चालवत असलेला गुळाचा कारखाना
पुण्यातील लवळे परिसरामध्ये असलेले हे गुऱ्हाळघर माधवी सरदेशपांडे यांच्याकडून आणि स्थानिक महिला कामगारांकडून चालवण्यात येते. या गुऱ्हाळघरामध्ये २४ तासांमध्ये ५०० किलो गूळ बनवला जातो. येथे ८ ते १० महिला आणि ३ ते ४ पुरूष काम करतात. जास्तीत जास्त महिलाच येथील कामाचे व्यवस्थापन करत असल्यामुळे आणि केवळ ठराविक कामे पुरूषांकडून केले जात असल्यामुळे हे राज्यातील एकमेव महिला संचालिक आधुनिक तंत्रज्ञानाचे गुऱ्हाळघर असावे असे म्हणायला हरकत नाही. 

गुळांच्या विविध प्रकारांची निर्मिती
येथे चॉकलेट गूळ, हळद गूळ, चहा गूळ, कॉफी गूळ, असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. चॉकलेट गूळ हा चपातीसोबतही खाता येऊ शकतो. त्याचबरोबर डोसा बरोबरसुद्धा खाता येतो. तो लवकर विरघळत असल्यामुळे तो खायला सोपा असतो. तर 'सर्वाय ब्रँड'च्या अंतर्गत गुळाची आणि गुळाच्या पदार्थांची विक्री केली जाते. 

रोजगारनिर्मिती
त्यांच्या या गुऱ्हाळघरामुळे लवळे येथील स्थानिक लोकांना रोजगाराची उपलब्धता झाली असून परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळत आहे. पश्चिम पुण्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांना सरदेशपांडे यांच्याकडून चांगला दर दिला जातो त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. 

पुण्यातील लवळे येथे असलेला सरदेशपांडे यांचा गुळाचा अत्याधुनिक सुविधा असेलला गुळाचा कारखाना
पुण्यातील लवळे येथे असलेला सरदेशपांडे यांचा गुळाचा अत्याधुनिक सुविधा असेलला गुळाचा कारखाना

केमिकल विरहीत अन्न खा
कोरोनानंतर लोकं आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. तर सध्या बाजारात मिळणारा गूळ हा सर्रासपणे केमिकल वापरून तयार केला जातो. त्यामुळे ग्राहकांनी आपण काय खातो याकडे लक्ष दिले पाहिजे आणि केमिकल विरहीत गूळ खाल्ला पाहिजे असं आवाहन सरदेशपांडे दाम्पत्य करतात.

कोणत्याही आणि कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, चिकाटी बाळगली तर माणूस आपल्याला हवा तो व्यवसाय करू शकतो असं त्यांच्या या प्रवासाकडे बघून जाणवते. IIT प्रोफेसर, राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरीमध्ये संशोधक ते आधुनिक पद्धतीचे केमिकल विरहीत गूळ बनवणारे गुऱ्हाळघर चालवण्यापर्यंतचा सरदेशपांडे दाम्पत्याचा प्रवास नक्कीच शेतकऱ्यांसाठी आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरेल. 
 

Web Title: pune vishal sardeshpande and madhavi deshpande IIT professor researcher at NCL highly educated couple who run Gurhalgharjaggery factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.