रणजीत गवळी
धाराशीव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील तरुण शेतकरी राहुल कल्याणराव पाटील यांनी जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शेतीला जोडधंदा म्हणून आपल्या शेतात १५ म्हशींचा प्रकल्प उभारला असून, आज ते या व्यवसायातून महिन्याला लाख ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळवत आहेत.
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील राहुल पाटील यांना वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यांच्या कुटुंबात राहुल हे सर्वांत लहान सदस्य असून, त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्या प्रमाणे सुरुवातीला एक म्हैस विकत घेऊन व्यवसायाला सुरवात केली.
त्यातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांना या व्यवसायात आवड निर्माण झाली. यानंतर एकेक करून एकूण १५ म्हशी विकत घेऊन पूरक दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. म्हशीचे योग्य संगोपन करण्यासाठी स्लॅबचा गोठा तयार केला. १५ म्हशींच्या माध्यमातून सकाळ आणि संध्याकाळ मिळून १०० लिटर दूध निघते.
म्हशींचा हा प्रकल्प उभारणीसाठी त्यांना एकूण २० लाखापर्यंत खर्च आला. या व्यवसायात राहुल पाटील यांना त्यांचे दोन भाऊ सहकार्य करतात. सकाळी ४ वाजता दूध काढण्यापासून त्यांच्या व्यवसायाची सुरुवात होते. यानंतर सकाळी सात वाजेपर्यंत सर्व ग्राहकांपर्यंत हे दूध पोहोचविले जाते. जवळपास १०० ग्राहकांना सकाळी आणि संध्याकाळी हे दूध घरपोहोच केले जाते.
या व्यवसायापासून त्यांना महिन्याला १ ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळत असून, खर्चापोटी त्यांना महिन्याला पन्नास ते साठ हजारांपर्यंत खर्च करावा लागतो.
म्हशीच्या शेणापासून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न
१५ म्हशीच्या संगोपनातून प्रत्येक महिन्याला ४ ट्रॅक्टर आणि वर्षाकाठी जवळपास ५० ट्रॅक्टरपर्यंत शेणखत जमा होते. शेणखाताला मागणी भरपूर असल्यामुळे एक ट्रॅक्टर पाच हजारपर्यंत विकला जातो. त्यातून त्यांना वर्षाकाठी २.५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने
पाटील कुटुंबाकडे असलेल्या पाच एकर शेतीत पारंपरिक पिके घेतली जातात. म्हशीच्या संगोपनासाठी लागणार चारा म्हणजेच मका, गवत, कडबा, भुसकट यासाठी ते शेतात सोयाबीन, मका, ज्वारी अशी पिके घेतात. ही शेती करण्यासाठी ते खत न वापरता म्हशींच्या शेणाचा वापर खत म्हणून करतात.
माझ्या शेतात मी मुर्रा जातीच्या म्हशींचा प्रकल्प उभा केला आहे. त्यातून मला रोज १०० लिटरपर्यंत दूध निघते. निघालेले दूध मी व माझ्या कुटुंबातील व्यक्त्ती ग्राहकांपर्यंत पोहोच करतो. मी जेव्हापासून दुग्ध व्यवसाय करतोय, तेव्हापासून माझी आर्थिक प्रगती झाली आहे. - राहुल पाटील, शेतकरी, शिराढोण.