- दत्ता लवांडे
पुणे : अगदी आपल्या नखाएवढ्या असलेल्या मुंग्यांच्या कामाला कधी न्याहाळून पाहिलंय का? आपल्या वजनाच्या किंवा आकाराच्या हजारपटीने मोठ्या असलेल्या हत्तीलासुद्धा नमवण्याची ताकद त्यांच्यात असते. कितीही मोठं संकट आलं, समोर मरण जरी दिसत असलं तरी त्यांचा प्रयत्न थांबत नाही अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असलेले काहीजण काम करत असतात. त्यांच्या संघर्षाच्या वाटा आपल्याला कायम प्रेरणा देत असतात. मूळचा सोलापूरच्या असलेल्या पुण्यातील राकेश काटकर नावाच्या तरूणाचा प्रवासही असाच काहीसा आहे.
कोरोनानंतर आलेल्या संकटात वडिलोपार्जित शेतीत तब्बल ५ ते ६ कोटींचा तोटा सहन करून आज त्यांनी द्राक्ष शेतीत आपला जम बसवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दर पडल्यामुळे त्यांनी आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना न विकता माई फार्म नावाचा आपला एक ब्रँड तयार केला. स्वत:च प्रक्रिया आणि विक्रीची वेगळी व्यवस्था निर्माण करून चांगला नफा ते मिळवत आहेत. ते सध्या पुण्यातील विविध ठिकाणी आपला द्राक्षमाल थेट ग्राहकांना आणि कमी दरात विक्री करत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या आणि एजंटच्या साखळ्या तोडून या अन्यायी व्यवस्थेशी दोन हात केले पाहिजेत असा संदेश ते इतर शेतकऱ्यांना देत आहेत.
रेसीड्यू फ्री द्राक्षांची ५० रूपये किलोप्रमाणे विक्रीद्राक्षाची निर्यात करण्याच्या हेतूने काटकर यांनी द्राक्ष पिकवले होते. त्याप्रमाणे त्यांनी काही देशांत द्राक्षांची निर्यात केलीसुद्धा. पण युरोपात द्राक्षाची मागणी असूनही हमास युद्धामुळे जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून युरोपात पोहोचावे लागत आहे. त्यामुळे सध्या द्राक्षाचे दर पडले आहेत. या संकटावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी रेसिड्यू फ्री द्राक्षाची पुण्यात थेट ग्राहकांना विक्री सुरू केली असून केवळ ५० रूपये किलोप्रमाणे ते ग्राहकांना घरपोहच माल देत आहेत.
दरम्यान, राकेश यांची सोलापूर जिल्ह्यात ८० एकर शेती असून त्यापैकी ५७ एकर द्राक्षाची बाग आहे. त्यांनी या बागामध्ये आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन केले असून आपल्या शेतात अनेक वेगवेगळे प्रयोग राबवले आहेत. एकात्मिक शेती व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतात शेळीपालन, मत्स्यपालन, देशी गोपालन, कोंबडीपालन, फळबागा, प्रक्रिया उद्योग अशा विविध व्यवसाय ते करत आहेत. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगामध्ये ते उसापासून गूळ, काकवी, गूळ क्यूब आणि गूळ पावडर सुद्धा बनवतात. द्राक्षापासून बेदाणा, जाम, ज्यूससुद्धा बनवले जाते. सध्या ते पुणे, पिंपरी चिंचवड शहरामध्ये द्राक्षाची थेट ग्राहकांना विक्री करत आहेत.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे पीक घेतले जाते. तर अनेकदा गारपिटीने अथवा अवकाळी पावसाने या द्राक्षाचे नुकसान होत असते. कधीकधी द्राक्षाला दर नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. सध्या इस्त्रायल हमास युद्धामुळे द्राक्ष निर्यातीवर फटका बसला असून एका किलोमागे ४० रूपयांचे नुकसान शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्षातून उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधावे लागत आहेत.
शेतीबद्दल कोणतेही ज्ञान नसताना, शेतीमध्ये नुकसानीच्या ठेचा लागून शिकलेले राकेश यांनी आता शेती व्यवसाय आणि प्रक्रिया उद्योगाबरोबरच विक्री व्यवस्थेवरही आपली पकड मजबूत बनवली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मालाच्या विक्रीसाठी आपली व्हॅल्यू चेन उभी केली पाहिजे, एकाच वेळी विक्रीचे किंवा प्रक्रियेचे दोन ते तीन पर्याय तयार करायला पाहिजेत तेव्हाच शेतकरी सध्याच्या स्पर्धेमध्ये टिकू शकेल असं मत राकेश काटकर यांनी व्यक्त केलं आहे.