Join us

ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 01:05 IST

Agriculture Success Story : कमी दिवसांत, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊन पपई हे पीक फायदेशीर ठरते, हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील रणजित जमदाडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

सरदार चौगुले

कमी दिवसांत, कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीचे उत्पादन घेऊन पपई हे पीक फायदेशीर ठरते, हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथील रणजित जमदाडे या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

पपई पिकातून त्यांनी वर्षात अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळविला. शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांपुढे रणजित यांनी कृतिशील आदर्श निर्माण केला आहे.

रणजित जमदाडे यांनी १० गुंठे जमिनीत 'तैवान ७८६' जातीच्या पपई पिकाची वर्षभरापूर्वी लागवड केली होती. या पिकातून वर्षात अडीच लाखांचा फायदा मिळाला असून, अजून दीड लाखांचे उत्पादन अपेक्षित आहे.

वर्षाला एका झाडापासून ५० ते ६० फळे मिळतात. एक फळ साधारणतः दीड ते दोन किलोच्या आसपास भरते. स्वतः विक्री केली तर एका फळाला ५० ते ६० रुपये बाजारभाव मिळतो. हे पीक सरासरी दोन ते अडीच वर्ष चालते.

फळपिकाचा अनुभव नसलेल्या जमदाडे यांनी उसाला पर्याय म्हणून गेल्या वर्षी पपईचे उत्पादन घेतले. कमी पर्जन्यमान आणि मुरमाड निचऱ्याच्या जमिनीत पपई पीक फायदेशीर असताना अधिक पर्जन्यमान्य असणाऱ्या भागात रणजित यांनी पपईचे पीक घेण्याचे धाडस करून ते यशस्वी केले.

प्रथम शेतीची मशागत करून चार ट्रॉली शेणखत टाकले. आठ फुटांचे बेड तयार करून सात फुटांवर रोपे लावली. आठ फुटांच्या मधल्या पट्टयात वांगी लावली. त्यातून पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळाले.

वांगी पिकातून उत्पादन खर्च निघाला. ऊस उत्पादन खर्चापेक्षा कमी खर्चात, कमी कष्टात चारपटीने नफा देणारे पपई पीक उसाला पर्यायी पीक असल्याचे जमदाडे यांनी दाखवून दिले आहे.

शेती सांभाळत खासगीत नोकरी

शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या जमदाडे यांनी सहा वर्षात पपई पिकाचे चार वेगवेगळे प्लॉट घेतले आहेत. ते शेती सांभाळत खासगीत नोकरी करतात. त्यांनी यू-ट्यूबवर पपई पिकाची माहिती घेऊन पपई पिकवली. त्यांनी दीपक शिंदे, दीपक चौगुले यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे.

उसाला पर्याय म्हणून पपई पीक घेतले. सहा वर्षांत चारवेळा पपईचे उत्पादन घेतले. बाजारपेठेत बसून स्वतः पपईची विक्री करणे हे कष्टाचे असले, तरी तेच फायद्याचे आहे. कमी खर्चात, कमी दिवसांत जास्त उत्पादन देणारी पपई शेती परवडणारी आहे. - रणजित जमदाडे, शेतकरी, पोर्ले तर्फ ठाणे.

हेही वाचा : ड्रोन होईल शेतकऱ्यांचा सालगाडी; वाचा भविष्यात कशी असेल ड्रोन तंत्रज्ञानाची आधुनिक प्रगत शेती

टॅग्स :शेतकरी यशोगाथाकोल्हापूरशेतकरीशेतीबाजारभाज्याफळेपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र