कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावची ओळख विविध प्रकारे सांगितली जाते. येथील साखर कारखान्यामुळे ऊस बागायतदारांचे रेठरे म्हणून पूर्वीची गावाची ओळख, मात्र, आता याच रेठरे बुद्रुकच्या 'रेठरे बासमती' आणि 'रेठरे इंद्रायणी' तांदूळ उत्कृष्ट चव आणि सुगंधामुळे देश-विदेशात प्रसिद्ध आहे.
कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे गाव कऱ्हाडपासून वाठारमार्गे अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर आहे. कऱ्हाड येथे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांचा संगम होऊन पुढे वाहत जाणाऱ्या नदीला 'कृष्णामाई' म्हणून ओळखले जाते. कार्वे, शेरे, गोंदी, मार्गे रेठरे बुद्रक गावाला वळसा घालून पुढे नृसिंहपुर, बहे मार्गे कृष्णामाई सांगली जिल्ह्यात प्रवेश करते. गावाच्या सभोवतालहून दुथडी भरून संथ वाहणारी ही कृष्णामाई नदी आणि काजळाच्या वडीप्रमाणे काळीभोर सुपीक जमीन ही जणू रेठरेकरांना लाभलेली देणगीच म्हणावी लागेल.
गावातील ज्येष्ठ मंडळींच्या अथक प्रयत्नातून येथील जुळेवाडीच्या त्यावेळच्या माळरानावर १९९० साली कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली अन् तिथपासून येथील बहुतांशी सर्वच शेतकरी ऊस पिकाकडे वळले. रेठरे बुद्रुकसह कृष्णाकाठावरील सर्वच भागांतील शेतकऱ्यांचे ऊस हे प्रमुख पीक बनले. शेतामध्ये उसाचे पीक वाढले. मात्र, उसातून अपेक्षित उत्पादन मिळत होते. या विचारातून येथील शेतकरी ऊस पिकाबरोबरच सोयाबीन, हरभरा, भात, गहू खपली तसेच इतर कडधान्य पिकांचे उत्पन्न घेऊ लागले.
अधिक वाचा: जाणून घ्या, कोयना धरण उभारणीपासून ते लेक टॅपिंगपर्यंतचा प्रवास
रेठरे बासमती भात या पिकाची निर्मिती कशी झाली, याविषयी येथील भागात उत्पादन करणारे शेतकरी सांगतात की, १९७० मध्ये कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते यांनी नैनिताल-हिमाचल प्रदेश येथून पहिल्यांदा ३७० नंबरचे बासमती तांदळाचे बियाणे रेठरे बुद्रुक येथे आणले. आणि या गावातील काही शेतकऱ्यांनाही दिले, हे बियाणे येथील सुपीक जमिनीत उत्तम प्रकारे रुजले. रेठऱ्याची माती अन् कृष्णामाईचे अमृतासमान असणारे पाणी, यामुळे या बासमती तांदळाला अप्रतिम चव आणि सुगंध निर्माण झाला. आणि पाहता-पाहता हा तांदूळ सर्वत्र सुप्रसिद्ध बनला भाताची विविध प्रकारची बियाणे लावणारे येथे शेतकरी आहेत. येथील माती व पाण्याचा गुणधर्म म्हणूनच येथील जमिनीतील तांदळाला एक प्रकारे अनोखी आणि उत्तम प्रकारची चव आहे.
रेठरे बासमती बियाण्यास एकरी ३० ते ५५ पोती एवढे उत्पन्न मिळते. गत काही वर्षांपासून महागाई वाढत गेल्यामुळे उत्पादन खर्च, मजुरी, खते, मशागतीचे दर वाढले. त्यामानाने उत्पन्न कमी होत असल्यामुळे काही शेतकऱ्यांनी रेठरे बासमतीला पर्याय म्हणून इंद्रायणी तांदूळ पीक घेण्यास सुरुवात केली. उत्पादन खर्च वाढल्यामुळे अन् एकरी उत्पादन घटल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रेठरे बासमती भात पिकाला पर्याय शोधला असला तरी रेठरे बासमतीला आजही चांगली बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे दिवसेंदिवस या बासमती तांदळाला मागणी वाढतच आहे.
अलीकडे काही नवीन शेतकरीदेखील हे बासमती तांदळाचे उत्पन्न घेत आहेत. तसेच येथील सुपीक जमिनीतील मातीचा गुणधर्म म्हणावा की काय म्हणून येथील इंद्रायणी तांदूळदेखील अप्रतिम चवीचा आणि सुगंधी आहे. त्यामुळेच रेठन्याचा इंद्रायणी तांदूळदेखील बाजारपेठेत चांगल्या बाजारभावाने विकला जात आहे. कृष्णाकाठावरील रेठरे बुद्रक परिसरात पिकवला जाणारा इंद्रायणी तांदूळदेखील 'रेठरे इंद्रायणी' म्हणून बाजारपेठेत उपलब्ध आहे. रेठरे बासमतीबरोबरच रेठरे इंद्रायणी तांदळालाही दिवसेंदिवस मागणी वाढतच आहे.
अधिक वाचा: आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प 'टेंभू'
इंद्रायणी भात पीक हे गावातील बरेच लोक घेतात. या पिकाचे एकरी ५० ते ६० पोतीदरम्यान चांगले उत्पन्न मिळते; परंतु रेठरे बासमतीच्या तुलनेत इंद्रायणी तांदळाचा दर कमी आहे. गत काही वर्षांपासून भातशेतीसाठी क्रियाशील असणारा शेतकरी गट रेठरे बासमतीपेक्षा उच्चप्रतीचा एखादा तांदळ पिकविता येतो का? याविषयी आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. त्यातीलच एक प्रयोग काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनाही केला. आपल्या शेतात रेठरे बासमतीबरोबरच इतर सहा प्रकारच्या भात बियाण्यांची प्रायोगिक तत्त्वावर त्या शेतकऱ्यांनी लागवड केली. मात्र, रेठरे बासमतीच्या तुलनेत या इतर बियाण्यांना चांगल्या प्रकारे वाढविणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही.
रेठऱ्याच्या मातीतील विविध तांदळाला अप्रतिम चव आहे, हे सर्व परिचित झाले आहे. तेव्हा राज्य शासनाने या मातीत भातशेतीबाबत विविध प्रयोग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे उपलब्ध करून द्यावीत, तसेच शेतकऱ्यांना भातपीक घेण्यासाठी विविध योजना निर्माण करून दिल्या तर देश-विदेशातील लोकांना उच्चप्रतीचा सुगंधी आणि चवदार तांदूळ पिकविण्यास मदत होईल, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
देश-विदेशातील मॉलमध्येही उपलब्धअल्पावधीतच बासमती तांदळाला मागणी वाढू लागली आणि चांगली बाजारपेठही मिळाली. आणि हाच रेठाच्या मातीत रुजलेला तांदूळ पुढे रेठरे बासमती म्हणून ओळखला जाऊ लागला. बाजारपेठेत अनेक प्रकारचे बासमती तांदूळ आहेत. मात्र, रेठरे बासमती तांदळाची चवच न्यारी आहे. त्यामुळे आजही सातारा जिल्ह्यासह पंजाब, हरयाणा, दुबई आदीसह विविध भागांमध्ये असलेल्या मॉलमध्ये रेठरे बासमती तांदूळ पाहावयास मिळतो. विविध ठिकाणच्या बाजारपेठेत या तांदळाला चांगला भावही मिळत आहे.
युवराज मोहितेकार्वे