दरीबडची : सोन्याळ (ता. जत) येथील सेवानिवृत्त अभियंता चंद्राम लायाप्पा पुजारी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लकडेवाडी (ता. जत) येथे चार एकर शेतीमध्ये या फळाची लागवड केली आहे. या शेतीतून त्यांना वर्षाकाठी २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पुजारी हे पुणे येथील संरक्षण खात्यातून अभियंता म्हणून निवृत्त झाले आहे. त्यानंतर त्यांनी शेतीत लक्ष घातले. पारंपरिक शेतीला फाटा देताना आधुनिक शेतीचा अवलंब केला.
त्यांची सोन्याळ, अंकलगी, कुल्लाळवाडी आणि लकडेवाडी (ता. जत) येथे एकूण १२ एकर शेती आहे. त्यापैकी लकडेवाडीतील जमीन खडकाळ व कमी पाण्याची असल्याने कोणतेही पीक येत नव्हते. त्यामुळे नवीन प्रयोग करण्याचे ठरवले.
चार एकर जमिनीवर ड्रॅगन फ्रूट्सची लागवड केली. खडकाळ व पडीक जमिनीची सुधारणा केली. चार एकर क्षेत्रामध्ये सात बाय अकरा अशा पद्धतीने एकरी पाचशे पोल बसविले. हैदराबाद आणि सांगोला येथून रोपे आणली. जुलै २०१८ मध्ये सिमेंटचे खांब उभे करून लाल रंगाच्या ड्रॅगन फ्रूटची लागवड केली.
निवडुंगासारख्या दिसणाऱ्या काटेरी ड्रॅगन वेलीला जुलै ते नोव्हेंबरदरम्यान फळे येतात. एका वेलीला एका तोडणीवेळी साधारणतः सहा ते आठ फळे येतात. प्रत्येक फळाचे वजन ३०० ते ८०० ग्रॅम भरते.
दर्जानुसार प्रतिकिलो साधारणतः ८० ते १५० रुपये भाव मिळतो. पुणे, हैदराबाद, बेंगळुरू, विजयपूर, मुंबई, कोल्हापूरसह स्थानिक बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. पाच वर्षांत योग्य निगा व उत्कृष्ट नियोजन केल्याने बाग चांगल्याप्रकारे फुलली आहे.
ड्रॅगन फ्रूट आरोग्यदायीड्रॅगन फ्रूट रोगप्रतीकारक शक्ती वाढविते. मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स, फायबर्स आणि क जीवनसत्त्व असते. त्यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी असते.
कमी खर्च आणि कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती फायद्याची आहे. बाजारातही मोठी मागणी आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे वळून उत्पन्नात वाढ करावी. - चंद्राम पुजारी
अधिक वाचा: खरबुज शेतीचा लागला लळा दोन एकरात आठ लाखाची लाॅटरी