Join us

Pomegranate Farming : सेवानिवृत्त शिक्षकाने माळरानावर फुलवली शरद किंग डाळिंब करतायत लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 3:50 PM

Pomegranate Farming : शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, याच पद्धतीने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील धनाजी भोंग या शेतकऱ्याने प्रयोगशील शेती करत डाळिंबातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

निमगाव केतकी : बहुतेक लोकं म्हणतात शेती तोट्यात आहे. खर्चाच्या मानाने उत्पन्न निघत नाही. बहुतेक वेळा भाव मिळत नसल्याने फायदा होत नाही. परंतु, योग्य पद्धतीने शेती केल्यास जमिनीतून सोनं उगवते. यासाठी थोडा धीर धरावा लागतो.

शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, याच पद्धतीने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील धनाजी भोंग या शेतकऱ्याने प्रयोगशील शेती करत डाळिंबातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळवले आहे.

निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आली आहे. त्यामुळे शेतीपासून शाश्वत उत्पन्नाची हमी उरली नाही. मात्र निमगाव केतकी येथील सेवानिवृत्त शिक्षक धनाजी 'भोंग यांनी प्रयोगशील शेती करत नैसर्गिक आपत्तीतून मार्ग शोधला.

माळरानावर असणाऱ्या आपल्या पाच एकर क्षेत्रात तरकारी पिके घेऊन ते शेतात आपला वेळ घालवू लागले. मात्र मिळणारा बाजारभाव आणि खर्च याचा ताळमेळ न बसल्याने त्यांनी फळबागा करण्याचे ठरवत आपल्या शेतामध्ये सुरुवातीला पेरू, ड्रॅगन फ्रूट, त्याचबरोबर डाळिंब अशा प्रकारच्या फळबागा लावल्या. 

मुलगा अमन भोंग यांनी बीएससी अॅग्री पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलांच्या खांद्याला खांदा देत शेतीत राबण्याचे ठरविले आणि अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

अभ्यासक्रमातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचे प्रयत्न करू लागला. शेतीतील कुठलाही अनुभव नसतानादेखील इच्छाशक्तीच्या जोरावर आणि अभ्यासक्रमातील अनुभवावर इतरांना लाजवेल, अशा फळबागा निर्माण केल्या.

या भागात प्रामुख्याने भगवा या प्रजातीचे डाळिंब मोठ्या क्षेत्रावर होते. रोगराई, तेल्या आणि मररोग यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी या डाळिंब फळबागा काढून टाकल्या आणि हळूहळू पेरूच्या फळबागा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या. मात्र मोठ्या प्रमाणात पेरूची झालेली लागवड आणि बाजारभाव यामुळे परत एकदा शेतकरी हळूहळू डाळिंब या फळबागांकडे वळू लागले.

डाळिंबाचा शरद किंग हा नवीन वाण आपल्या शेतीमध्ये याच वाणाची डाळिंब फळबाग करण्याचे ठरवले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुपेवाडी येथून ५२५ गुटी कलमे खरेदी करून त्यांची रोपे तयार करत बारा फूट बाय आठ फुटांवर एक खोड पद्धतीने लागण केली.

सुरुवातीपासूनच शेणखत व जैविक पद्धतीने ही रोपे वाढवली. एका वर्षाच्या काळात पहिला बहर धरला. एका वर्षात बहार धरल्याने डाळिंब रोपांवर कमी प्रमाणात फळधारणा लागण्याची शक्यता होती. मात्र रोपांवर फळे बहरली. या नवीन डाळिंब वाणाची चर्चा होऊ लागली. आणि अनेक भागातील शेतकरी या फळबागेला भेटी देण्यासाठी येऊ लागले.

बीएससी अॅग्री शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मलाही वाटत होते की एखादी सरकारी नोकरी मिळवावी परंतु सध्या नोकरी मिळणे हे जिकिरीचे झाले आहे. आपण घेतलेल्या शेती विषयक शिक्षणातून पारंपरिक शेतीला फाटा देत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मेहनत व चिकाटीने काहीतरी नावीन्यपूर्ण प्रयोग करून नोकरीच्या मागे न लागता, शेतीमध्येही वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पादन घेता येऊ शकतो. - अमन भोंग, डाळिंब उत्पादक शेतकरी

टॅग्स :डाळिंबफळेशेतकरीशेतीफलोत्पादनइंदापूरसेंद्रिय खत