सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील मनोज गाजी या युवा शेतकऱ्याने प्रकाश रुकडे यांच्या शेतात सुमारे १५ एकर ढबू मिरचीची लागवड केली असून, त्यातून एकरी लाखांवर उत्पादन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनोज गाजी यांनी ढबू मिरचीतून लाखो रुपयांचे अधिक उत्पादन घेतले होते.
दूधगाव येथील मनोज गाजी हे १६ वर्षांपासून कृषी क्षेत्रात आहेत. प्रकाश रुकडे यांच्या शेतात त्यांनी १५ एकर ढबू मिरचीची २० मार्च रोजी लागवड केली. तत्पूर्वी शेताची उभी आडवी नांगरट करून शेणखत घातले.
त्यानंतर पाच फुटी सरीवर झिगझेंग पद्धतीने एकरी १४ हजार सिजेंटा इंद्रा रोपांची लागवड केली. शेतीला अत्याधुनिक ऑटोमायझेशन पद्धतीने ठिबकद्वारे पाणी तसेच एक दिवसआड पाणी व खताची फवारणी करण्यात येते.
रोग किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने नियमितपणे कीटकनाशके व अन्नद्रव्य खतांची फवारणी करण्यात येते. यावर्षी तापमान वाढ व रोगराईमुळे, दरातील चढ-उतारामुळे ढबू मिरचीची लागवड कमी झाली. ढबू मिरचीचे उत्पादन सुरू झाले असून, तिसरा तोडा सुरू आहे.
दिल्ली, हैदराबाद, मुंबई व बेळगाव या ठिकाणी डबू मिरची पाठवली जाते. सध्या ढबूला ६० रुपये किलो दर मिळत आहे. भविष्यात दर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. एकरी एकूण ४० ते ५० टन उत्पादन अपेक्षित असून, एकरी १५ ते २० लाख उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यांना रोहित ऐतवडे व मित्रांचे सहकार्य मिळत आहे.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मनोज गाजी व रोहित ऐतवडे यांनी स्वस्तिक भाजीपाला ग्रुपच्या माध्यमातून आष्टा व परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विषयक मार्गदर्शन केले जाते. तसेच भाजीपाला हैद्राबाद, बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरात भाजीपाला पाठविला जात आहे, असे प्रगतशील शेतकरी मनोज गाजी यांनी दिली.
अधिक वाचा: कीर्तनकार महाराजांची शेती; जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेली ज्वारी वाढली तब्बल १६ फुट