मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : तालुक्यातील भगवतीनगर (निवेंडी) येथील सतीश वसंती सोबळकर यांनी १५ एस.टी.मध्ये वर्षे चालकाची सेवा बजावली. मात्र, शेतीची आवड असल्याने नोकरीला रामराम करून शेतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी ३० एकर क्षेत्रावर नियोजन करून बागायत फुलवली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागात कार्यरत असलेल्या सतीश यांनी १५ वर्षे चालक पदावर काम केले. प्रवासी वाहतूक सेवा करत असताना त्यांच्यामधील शेतीची आवड स्वस्थ बसू देईना. अखेर चालकाची नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीकडेच लक्ष केंद्रित केले आहे.
सतीश यांनी जमिनीची योग्य मशागत करून १०५० आंबा, २०० नारळ, २५० सुपारी, २५० काजू, ३० फणस लागवड केली आहे. बागेतच विहीर असल्याने बागायतीसाठी मुबलक पाणीपुरवठा होत आहे. उत्पादन सुरू झाले आहे. आंबा उत्पादनापैकी ५० टक्के आंबा ते वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात.
सुरुवातीला दर चांगला असल्यामुळे वाशी बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविणे सुलभ ठरते तर उर्वरित ५० टक्के आंबा खासगी विक्री करतात. चांगल्या दर्जाचा आंबा ते उपलब्ध करून देता असल्यामुळे मुंबई, पुण्यातील ग्राहक थेट संपर्क करून आंबा खरेदी करतात.
उर्वरित आंब्यापासून आमरस, आंबा पोळी, फणसाचे तळलेले गरे, पोळी तयार करून विक्री करतात. दर खाली आल्यावर अल्प भावात आंबा विक्रीपेक्षा प्रक्रिया उत्पादनांतून अधिक पैसे मिळविता येत असल्याचे सतीशा यांनी सांगितले. बारमाही शेतीमुळे स्थानिक चार ते पाच मजुरांना रोजगार मिळाला आहे. कृषी तज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.
कंपोस्ट खत निर्मिती व वापर
- बागेतील पालापाचोळा एकत्र करून त्यामध्ये जनावरांचे शेण मिक्स करून कंपोस्ट खतनिर्मिती करत आहेत. हेच खत बागायतीसाठी वापरत असून त्यामुळे प्रत्येक झाड सशक्त असून उत्पादित फळांचा दर्जाही उत्तम आहे.
- बागायतीसह ते खरिपात भात लागवड करीत असून अन्य दिवसात भाजीपाला उत्पादनही घेत आहेत. बारमाही शेतीवरच त्यांनी लक्ष केंद्रीत केले असून नारळ, सुपारी बागेत काळी मिरी, जायफळ, दालचिनी या मसाला पिकांची लागवड केली आहे.
काजू बी योग्य दर पाहून विक्री करत असून सुपारीची विक्रीही याचपद्धतीने करत आहेत. स्थानिक बाजारात नारळाचा खप होतो. नारळ, सुपारी बागेत मसाला पिकांची आंतर लागवड केली आहे. काळीमिरी, दालचिनी, जायफळ लागवड केली आहे. शहाळे तसेच नारळासाठी विशेष मागणी आहे. जवळच गणपतीपुळे पर्यटनस्थळ असल्यामुळे नारळ/शहाळ्यासाठी योग्य दर आल्यास विक्री करतात. थेट विक्रेते संपर्क करतात, असे सतीश यांनी सांगितले.
व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शेती केली तर ती नक्कीच परवडते. शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवते, हे खरे आहे. यांत्रिक अवजारांच्या वापरामुळे वेळ, श्रम, पैशांची बचत होत आहे. खरीप असो वा उन्हाळी शेती योग्य नियोजन असले तरी सर्व काही शक्य होते. सेंद्रीय खते स्वतः तयार करून वापर करत आहे. कीडरोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशक फवारणी करावी लागते. शासनाच्या 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर भर दिला असून त्यामुळे ग्राहक जोडले गेले आहेत, त्याचा फायदाही होत आहे. - सतीश सोबळकर, भगवतीनगर (निवेंडी)
अधिक वाचा: प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड