Saffron Farming :
बापू सोळुंके :
छत्रपती संभाजीनगर येथे जम्मू काश्मीरसारखे थंड वातावरण घरातील बंद खोलीत तयार करून केशर शेतीचा आगळा-वेगळा प्रयोग शहरातील एका निवृत्त कृषी अधिकाऱ्याने केला.
त्यांच्या या प्रयोगाला यशही आले असून, केशर उत्पादनाला सुरुवात झाली. या प्रयोगाची माहिती मिळताच विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी केशर फार्मला भेट देत या प्रयोगाचे कौतुक केले.
छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा भागातील संजय हाउसिंग सोसायटीतील रहिवासी निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मीकांत अपसिंगेकर आणि त्यांची पत्नी मीना अपसिंगेकर यांनी यू ट्यूब वर केशर शेतीविषयी माहिती घेतली.
पुण्यातील अक्षय मोडक यांनी केशर फार्मिंगचा प्रयोग केल्याचे त्यांना समजले. त्यांनी पुण्यात जाऊन केशर फार्मिंगचे ट्रेनिंगही घेतले. बंगल्यातील ९ बाय ११ चौरस फूट आकाराच्या खोलीत काश्मीरसारखे थंड वातावरण तयार केले.
काश्मीरमधील सरासरी तापमान आणि आर्द्रतेचा अभ्यास करून खोलीतील हवेतील आर्द्रता ७० टक्के राहावी, याकरिता एअरोफोनिक यंत्राद्वारे तर कूलिंग तंत्रज्ञानाद्वारे खोलीचे तापमान दिवसा २१ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान ८ अंश सेल्सिअस असे मेटेंन केले.
पिकाला आवश्यक तापमान मिळावे, यासाठी लाइटची व्यवस्था केली. ८०० रुपये प्रती किलो याप्रमाणे ८० किलो केशरकंद विकत आणून ट्रे मध्ये त्यांची लागवड केली. साडेतीन महिन्यांनी केशरचे उत्पादन सुरू झाले.
केशरला प्रति किलो पाच लाख रुपये दर
* आयुर्वेदात केशरचे अनेक गुणकारी लाभ सांगितले आहेत. यामुळे केशरला जगभर मागणी असते. भारतातील जम्मू, काश्मीरमध्येच केशर शेतीला पूरक हवामान आहे.
* देशातील एकूण मागणीच्या केवळ ११ टक्केच उत्पादन होते. यामुळे सुमारे ८९ टक्के केशरची आयात करावी लागते. मागणीच्या तुलनेत उत्पादनही कमी असल्याने केशरला आज सुमारे पाच लाख रुपये प्रति किलो असा दर आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार
• यावर्षी २०० ते २५० ग्रॅम केशर उत्पादन होण्याची शक्यता अपसिंगेकर यांनी वर्तविली. पुढील दोन वर्षांत खर्च वसूल होईल, यानंतर ही केशर फार्मिंग नफ्यात असेल.
• हा मराठवाड्यातील पहिला केशर फार्म प्रयोग आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी केशर शेती करावी, यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार आहे.
'केशर कंद' चेही उत्पादन लॅबमध्येच घेणार
• केशर उत्पादनासाठी केशर कंदची गरज असते. केशरचे उत्पादन निघाल्यानंतर केशर कंदची कोकोपीट, पोयटा माती आणि गांडूळ खत टाकलेल्या मातीत लागवड करण्यात येते.
• यानंतर अद्रकसारखे एका कंदाचे अनेक कंद तयार होतात. हे कंद पुढील उत्पादनासाठी वापरता येते.
• अपसिंगेकर हे आता त्यांच्या केशर फार्मिंग लॅबमध्ये केशरकंदाची लागवड करणार आहेत. यातून मिळणारे कंद पुढील उत्पादनासाठी त्यांना वापरता येतील.